Ranjangaon Ganpati : रांजणगाव देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांना यश

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत रांजणगाव गणपती श्री क्षेत्राला ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. या निर्णयामुळे रांजणगाव गणपती क्षेत्राचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या सर्वांगीण विकास होणार आहे.

ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट (ता. शिरूर) यांना ग्रामीण तीर्थक्षेत्र “ब” वर्ग असा मान्यता दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे देवस्थानाला शासनाकडून निधी, सुविधा, विविध विकास योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल माजी सहकार मंत्री वळसे पाटील यांनी राज्य शासनाचे, तसेच प्रक्रियेत सहभाग असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत.

त्यांनी विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.वळसे पाटील म्हणाले, रांजणगाव गणपती हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थस्थान असून, दरवर्षी येथे लाखो भाविक येतात. शासनाच्या माध्यमातून देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मिळवून पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधांचा विकास करण्यात येईल.

रांजणगावला विकासाला चालना- पाचुंदकर
निर्णयाचे स्वागत करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील म्हणाले,दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रांजणगाव गणपती देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे रांजणगाव परिसराचा सर्वांगीण विकास होईल. पर्यटनवाढीस मोठी चालना मिळेल.

The post Ranjangaon Ganpati : रांजणगाव देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांना यश appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!