शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पीएम किसानचे 2000 रुपये ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेद्वारे दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 20 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या पीएम किसान योजनेत पहिला हप्ता 24 फेब्रुवारी 2019 रोजी जारी करण्यात आला होता. 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी 9.7 कोटी शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपये वितरित करून देण्यात आला होता.

21 व्या हप्त्यात 18 हजार कोटी रुपये वितरण

योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 19 नोव्हेंबरला 21 व्या हप्त्यात सुमारे 18 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पूरग्रस्त राज्यांतील शेतकऱ्यांना मात्र ही रक्कम आगाऊ देण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी ही मदत दिली गेली.

आतापर्यंत या योजनेतून 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3.70 लाख कोटी रुपये वितरित झाले आहेत. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला 20 हप्त्यांमध्ये एकूण 40,000 रुपये मिळाले आहेत. हप्ते जारी करण्यात किमान चार महिन्यांचे अंतर ठेवले जाते.

ई-केवायसी अनिवार्य

21 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. ही प्रक्रिया सीएससी केंद्रावर, पीएम किसान वेबसाइटवर किंवा ओटीपी आधारित, बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे करता येईल.

The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! पीएम किसानचे 2000 रुपये ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!