
आळंदी – ( ज्ञानेश्वर फड )
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥
कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून भाविक पुणे, चाकण, मरकळ, शेलपिंपळगाव आदी मार्गांनी आळंदीत पोहोचत आहेत. सर्व मार्ग भाविकांनी फुलले असून हरिनामाचा गजर करत दिंड्यामध्ये चालत तर अनेकजण वाहनांनी आळंदी जवळ करताना दिसत आहेत. आज नवमीच्या दिवशी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वेळेत वीणा मंडपात ह.भ.प. बाबासाहेब देहूकर महाराज यांच्यातर्फे तर रात्री साडेनऊ ते अकरा वेळेत ह.भ.प. वासकर महाराज यांच्यातर्फे कीर्तनसेवा झाली.
नित्य गुरूवार पालखी प्रदक्षिणा रात्री नऊ ते साडे अकरा वेळेत झाली. माऊलींच्या सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरासह आळंदी आणि पंचक्रोशीत हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले आहे. पहाटे काकड आरती ते रात्री जागर असे विविध कार्यक्रम होत असून चोहीकडे हरिनामाचा गरज ऐकायला मिळत आहे.आळंदीत आता गर्दी वाढत असून आळंदीत प्रवेश करणारे सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली असून दिंड्यांची आणि अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
इंद्रायणी घाट, प्रमुख चौक आणि मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग असतो. त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवल्यास त्यांच्यावर उपचारासाठी आळंदी ठिकठिकाणी आरोग्य बुध उभारण्यात आले आहेत. इंद्रायणी काठावरील वैतागेश्वर मंदिर आरोग्य बुथवर डाॅ. संदीप भालेकर, प्र. डाॅ. हनिशा रेलन, मोयना मोनिश, सेजल गायकवाड, आर. व्ही. पाचपोर, जे. एन हांडे भाविकांना औषधोपचार करीत होते. कार्तिकी एकादशी यात्रा शनिवारी (दि.15) तर समाधी सोहळा सोमवारी (दि.17) होणार आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयाय सज्ज
ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे २४ तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा चालू ठेवण्यात आली आहे. ५ आय. सी. यु बेड, दहा ठिकाणी औषधोपचार बूथ, माऊली मंदिर येथे एका बेडसह ऑक्सिजन आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम सुविधा, खाजगी रुग्णालयांत ४० टक्के खाटा राखीव, वारीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ, रुग्णवाहिकेची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. इतर सर्व आरोग्यविषय तयारी पूर्ण झाली असून आम्ही 24 तास भाविकांच्या सेवेत आहोत, अशी माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उर्मिला शिंदे यांनी दिली.
अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना अखंडित आणि सुरक्षित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने युध्द पातळीवर कामे पूर्ण केली आहेत. तांत्रिक अडचणींवर मात करून तात्काळ दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी विशेष नियोजन केले असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. दोन वेगवेगळ्या वाहिन्यांद्वारे (फिडर) आणि दोन उपकेंद्रातून वीज पुरवठा, माऊली मंदिरासाठी तसेच मंदिर परिसरात नवीन २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवले,
गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सर्व रोहित्रांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एफआरपी फेसिंग बसवले, सर्व वीज वाहिन्यांचे एबी स्विच आणि जीओडी यांचे योग्य मेंटेनन्स केले, सर्व मनुष्यबळ आणि तांत्रिक सज्जता पूर्ण केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून २४ तास सेवेत असणार आहेत, अशी माहिती आळंदी महावितरणचे स. अभियंता संदीप पाटील यांनी दिली.
दर्शनबारी स्कायवाॅक पुलावर
माऊलींच्या समाधी सोहळा आणि कार्तिकी वारीसाठी आलेले वारकरी, भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत लागले आहेत. आज नवमीच्या दिवशी ही दर्शनबारी रांग स्कायवाॅक पुलावर आली होती. तरी दशमीला ही दर्शनबारी नवीन तात्पुरत्या उभारलेल्या दर्शनमंडपात जाईल. दर्शनरांगेतील भाविकांना देवस्थान कमिटीकडून पाणी, फराळ, जेवण वाटप केले जात आहे. आज दिवसभरात सुमारे 40 हजार भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांना 3 ते 4 तास वेळ लागत होता, अशी माहिती माऊली देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम –
-पहाटे 3 ते 5 : पवमान अभिषेक व दुधारती.
-सकाळी 5 ते 11.30 : श्रींच्या चल पादुकांवर भाविकांच्या महापूजा
-दुपारी 12 ते 12.30 : श्रींना महानैवेद्य
-दुपारी 4.30 ते 6.30 : ह.भ.प. गंगुकाका शिरवळकर यांच्यातर्फ कीर्तन
-सायंकाळी 6.30 ते 8.30 : धोंडोपंत दादा अत्रे यांच्यातर्फे कीर्तन
-रात्री 8.30 ते 9 : धुपारती
-रात्री 9 ते 11 : ह.भ.प. वासकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन
-रत्री 11.30 ते 12.30 : ह.भ.प. वाल्केर महाराज यांच्यातर्फे जागर
The post Kartiki Wari : हरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी; कार्तिकी वारीसाठी प्रशासनासह आरोग्य आणि महावितरण विभागही सज्ज appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











