Dainik Prabhat : आजच्या दिवसभरातील टॉप १० बातम्या एका क्लिकवर !

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

१) निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना धक्का; शाखाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

२) १० हजार रुपयांच्या योजनेमुळे फायदा; बिहार निवडणुकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत. तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीच्या निकालानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पैसे वाटून निवडणुका होत असतील तर त्याचा विचार झाला पाहिजे. निवडणुकीपूर्वी १० हजार रुपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शन आहे आणि ते सरकारने केलं आहे. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्यावतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले, म्हणजे लाडकी बहीण योजना. निवडणूकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे चिंतेची बाब आहे.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

३) बिहार निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय; मुंबईतील बैठकीत थेट घोषणा

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायती समितासाठी निवडणुका होतील. त्यानंतर सर्वांत महत्वाच्या अशा महापालिका निवडणुकांचा बार उडणार आहे.

अशातच महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

४) अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु पोरकं झालं; नवले ब्रीज अपघातात मराठी अभिनेत्याचा दुर्देवी अंत

पुण्यातील नवले पुलावजळ झालेल्या भीषण अपघाताने पुणेकरांना थक्क केले. गुरुवारी १३ नोव्हेंबरच्या दिवशी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेली भीषण अपघाताची घटना सर्वांनाच्या मनाला चटका लावून गेली. या अपघातात एकूण आठ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले.

या अपघातात एका मराठी अभिनेत्याचा देखील मृत्यू झाला आहे. कारचालक असलेला ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील पाच जणांना बाहेर पडता आले नाही. अचानक आग लागल्याने सर्वजण आगीत जीवाच्या आकांताने ओरडत होरपळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

५) बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; माजी केंद्रीय मंत्र्यांसह तिघे पक्षातून निलंबित

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या दणदणीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने कठोर पावलं उचलली आहेत. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्यासह आमदार अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल या तिघांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. पक्षविरोधी भूमिका आणि शिस्तभंगाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

आर.के. सिंह नुकतेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. एका भाषणात त्यांनी जनता दलचे नेते नितीश कुमार यांच्यावर ६२ हजार कोटींच्या घोटाळ्याचा थेट आरोप केला होता. इतकंच नव्हे, तर बिहार भाजप नेते सम्राट चौधरी यांना ‘खुनी’ असं संबोधून त्यांनी पक्ष आणि मित्रपक्षाची प्रतिमा मलीन केली. याच कारणास्तव भाजपने तातडीने निलंबनाची कारवाई केली.

६) मी राजकारण सोडतेय अन् कुटुंबही; लालू प्रसाद यादवांच्या मुलीची मोठी घोषणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला असताना, आता पक्ष प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. लालूंची छोटी मुलगी आणि तेजस्वी यादव यांची बहिणी रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक्सवर एक रहस्यमय पोस्ट करत राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.

रोहिणींच्या पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार आणि तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव तसेच रमीज यांच्यावर थेट आरोप केले. “मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितले होते. सगळ्या गोष्टींची जबाबदारी मी घेत आहे,” असं रोहिणी म्हणाल्या. ही घोषणा कुटुंबातील वाढत्या मतभेदांची आणि पक्षातील सत्तासंघर्षाची चित्रण करते, ज्यात रोहिणींनी स्वतःला सर्व दोषी करून कुटुंबाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला असावा, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

७) अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची माघार; टॅरिफबाबत केली मोठी घोषणा

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, याचा फटका हा सध्या दोन्ही देशांना बसत असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय हा त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे, जीवानावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत. सर्व सामान्य लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत, अमेरिकेमध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फळं, बीफ, कॉफी, चहा यासारख्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या निर्णयावर सही देखील केली आहे. त्यामुळे महागाई कमी होऊन अमेरिकेतील लोकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा आता इक्वाडोर, ग्टाटेमाला, अर्जेटिंना यासारख्या देशांसह अनेक देशांना होणार आहे.

८) श्रीनगरमध्‍ये पोलीस ठाण्‍यात स्‍फोट; ९ जणांचा मृत्‍यू, ३२ जण जखमी

श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्‍यरात्री झालेल्‍या स्फोटात नऊ जण ठार, तर ३२ जण जखमी झाले आहेत. ही स्‍फोट व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलच्या सुरू असलेल्या तपासावेळी हरियाणातील फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातून विशेष पथक नमुने काढत असताना घडली.

यात काही जखमींची प्रकृती गंभीर असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफसीएल) पथकामधील तीन कर्मचारी, दोन छायाचित्रकार, दोन महसूल अधिकारी, राज्य तपास यंत्रणेचा एक अधिकाऱ्यांसह एक शिंपी मृत्युमुखी पडले. दरम्‍यान, जम्‍मू-काश्‍मीरचे मुख्‍यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेबद्दल शोक व्यक्त केले.

९) अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद; पहिल्याच दिवशी मोठी कमाई

अभिनेता अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. चित्रपटातील अजय देवगणचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच अजय आणि रकुलची केमिस्ट्री खूपच भन्नाट आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहच्या ‘दे दे प्यार दे 2‘ चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

१०) आयपीएलसाठी खेळाडूंचे पार पडले ट्रेडिंग; रिटेन्शनची शेवटची तारीख आज संपली

आयपीएल २०२६ सीजनसाठी खेळाडू रिटेन्शनची शेवटची तारीख आज संपली. या ट्रेंड विंडोमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असेलली सर्वात मोठी डील झाली. सीएसकेने आपला स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा रॉजस्थान रॉयल्सला दिला तर राजस्थान रॉयल्सने त्यांचा कॅप्टन संजू सॅमसनला सीएसकेकडे सोपवला. याशिवाय आणखी काही खेळाडूंचे ट्रेडिंग झाले पार पडले.

त्यामध्ये रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून, संजू सॅमसन चेन्नई सुपरकिंग्सकडून, सॅम करन राजस्थान रॉयल्सकडून, मोहम्मद शमी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच मयंक मार्कंडेय मुंबई इंडियन्सकडून, अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जायंट्सकडून, नितीश राणा दिल्ली कॅपिटल्सकडून तर डोनोवन फरेरा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.

The post Dainik Prabhat : आजच्या दिवसभरातील टॉप १० बातम्या एका क्लिकवर ! appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!