
बिहार.. एक असं राज्य, ज्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांची धडधड वाढवली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी रेकॉर्डब्रेक मतदान केलं. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 9 टक्के जास्त होती. त्यानंतर एनडीएच्या बाजूने निकाल लागला. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचं राज्य असेल. एनडीएला जरी या निवडणुकीत बहुमत मिळालं असलं तरी निवडणूक कोण जिंकेल याची पर्वा न करता नितीश कुमार नेहमीच त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा करतात. म्हणूनच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सर्वाधिक काळ राज्य केलं आहे. बिहारच्या इतिहासात सर्वांत जास्त काळ मुख्यमंत्री असूनही नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक का लढवली नाही, याविषयी सविस्तररित्या समजून घेऊयात..
नितीश कुमार यांनी शेवटची विधानसभा निवडणूक कधी लढवली?
नितीश कुमार यांनी 1985 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यांनी 1977, 1980 आणि 1985 मध्ये सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाग घेतला होता. परंतु नशिबाने त्यांना फक्त 1985 च्या निवडणुकीत साथ दिली. 1977 आणि 1980 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणापासून स्वत:ला दूर केलं आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं.
नितीश कुमार यांनी फक्त एकच विधानसभा निवडणूक जिंकली असली तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपवादात्मक कामगिरी केली. 1989, 1991, 1996, 1998 आणि 2004 मध्ये त्यांनी सलग सहा लोकसभा निवडणुका जिंकल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाढ आणि नालंदा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु फक्त नालंदा मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. ही त्यांची शेवटची वैयक्तिक निवडणूक होती. त्यानंतर त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही.
नितीश कुमार यांनी नोव्हेंबर 2005 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. नऊ महिन्यांचा काळ सोडला तर ते आजपर्यंत बिहारवर राज्य करत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्ता हाती घेतली. परंतु राजकीय मतभेदांमुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जितन राम मांझी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मांझी आणि भाजपमधील जवळीक पाहून नितीश कुमार यांनी 2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कमबॅक केला आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यानंतर त्यांनी आरजेडीसोबत युती केली आणि मजबूत जनादेश मिळवला. परंतु 2017 मध्ये ते एनडीएमध्ये परतले. बिहारमध्ये जनादेश कोणालाही मिळाला तरी नितीश कुमार यांनी कधीच मुख्यमंत्रीपद सोडलं नाही. त्यांना वाटलं तेव्हा ते महाआघाडी सामील झाले आणि जेव्हा कटुता निर्माण झाली तेव्हा त्यांनी एनडीएमध्ये कमबॅक केलं.
बॅकडोअरने एण्ट्री
2000 मध्ये नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हा ते राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. अवघ्या आठ दिवसांत त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक न लढवता मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि नंतर विधान परिषदेद्वारे सत्ता कायम ठेवली. समोरून न येता मागच्या दाराचा हा मार्ग नितीश कुमारांना सर्वाधिक आवडला. म्हणून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचारही केला नाही. ते याच मार्गावर चालत राहिले.
आपल्या देशात सहा अशी राज्ये आहेत, जिथे विधान परिषद आहे. बिहार त्यापैकीच एक राज्य आहे. यामुळे मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीद्वारे थेट निवडून न येताही सत्तेतील पद मिळवण्याची परवानगी मिळते. नितीश कुमार यांचा विधान परिषदेचे आमदार म्हणून पहिला कार्यकाळ 2012 मध्ये संपला. त्यानंतर ते पुन्हा निवडून आले. परंतु त्यांना या निर्णयाबद्दल टीकेचा सामना करावा लागला.
नितीश कुमार यांनी विधान परिषदेचा मार्ग का निवडला?
जानेवारी 2012 मध्ये विधान परिषदेच्या शताब्दी समारंभात नितीश कुमार म्हणाले होते, “मी माझ्या इच्छेने विधान परिषदेचा सदस्य होण्याचा निर्णय घेतला. यात कोणाचीही बळजबरी नव्हती. कारण विधान परिषद ही अत्यंत आदरणीय संस्था आहे. सध्याचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून येईन.”

राजकारणात पारंगत नितीश कुमार
बिहारमध्ये अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले नितीश कुमार राजकारणात पारंगत आहेत. बिहारच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाचं जनतेनं कौतुक केलं आहे. याच विकासकामांमुळे त्यांना ‘विकास पुरुष’ ही पदवी मिळाली आहे. बिहारमधील महिलांसाठी त्यांनी अनेक पाऊलं उचलली आहेत. नितीश कुमार यांचा सर्वांत मोठा मास्टरस्ट्रोक हा महिलांसाठी आरक्षण होता. आज बिहार हे देशातील पहिलं राज्य आहे, ज्याने स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं आहे. 2005 पूर्वी बिहारमधील पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण नव्हतं. त्यानंतर राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्येही महिलांसाठी 35 टक्के आरक्षण कोटा लागू केला.
दारुबंदी आणि मुलींसाठी पोशाख योजना
जीविका दीदी गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका महिलेचं म्हणणं ऐकून नितीश कुमार यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला. त्यांनी केवळ दारूबंदी केली नाही तर महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदेही केले. महिलांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत खुल्या मनाने केलं. यासोबतच मुलींसाठी पोशाख आणि सायकल योजना लागू केल्यानंतर बिहारमध्ये मुलींसाठी शिक्षणाचे नवे दरवाजे उघडले.
नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक
एका अनुभवी राजकारण्याप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय डावपेच आखले होते. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेची रक्कम वाढवणं, 125 युनिटपर्यंत मोफत वीज देणं आणि मोठ्या संख्येने तरुणांना नोकऱ्या आणि रोजगार देण्याचं आश्वासन देणं यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसंच 1000 रुपये महिलांच्या खात्यात हस्तांतरित करणं हा सर्वांत मोठा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणूनच गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान केलं.
2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की ते वैयक्तिकरित्या विधानसभा निवडणूक लढवणार नाही. यामागचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले की त्यांना फक्त जागेपुरतं लक्ष केंद्रीत करायचं नव्हतं. 2018 मध्ये नितीश कुमार तिसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आले आणि मार्च 2024 मध्येही तेच घडलं. आता ते 2030 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य राहतील.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











