
सातारा – पंचायत राज अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. सामाजिक स्वयंसेवी संस्था समृध्द पंचायतराज अभियान मित्र म्हणून काम करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत सामाजिक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी नागराजन बोलत होत्या. या बैठकीत अभियानाच्या उद्दिष्टांची आणि करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावांमध्ये लोकजागृती करुन ग्रामविकास, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण व बालविकास, शिक्षण, आरोग्य, सेंद्रीय शेती, कौशल्य विकास, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणी, हवा, हयुमन ट्रॅफिक तसेच रोजगार निर्मिती या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेवून अभियान जिल्हयामध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी आणि ग्रामपंचायतींना पुरस्कारप्राप्त होण्याकामी चर्चा करण्यात आली.
सरकारच्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि महत्वाकांक्षी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकजागृती करुन शासन यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. आपली संस्था आपण सातारा जिल्हयामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहातच तरी आपल्या कार्याचा आणि अनुभवाचा फायदा या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी करावा, असे आवाहन नागराजन यांनी केले.
पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवा संस्थांनी प्रशासनाशी मैत्री करुन सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज व्यक्त केली. सेवाभावी संस्थाच्या सहकार्याने प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली यापुर्वी नारु रोग हद्दपार केला तसेच शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव यशस्वीतेसाठी सामाजिक संस्थेचे मोठे योगदान आहे. संस्थेने केलेल्या पाणी फाउंडेशन मधील विविध कामांची त्यांनी माहिती दिली.
बैठकीदरम्यान विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सद्यस्थितीत करीत असलेल्या तसेच अभियानाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत मत, सूचना व अनुभव मांडले. सर्व संस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी अभियानविषयक निकष, कार्यवाहीचे स्वरुप व गुणांकन याविषयी मार्गदर्शन केले. उमेद अंतर्गत सामाजिक संस्थांनी महिलांचा सहभाग घेवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी केले. याप्रसंगी सहायक गट विकास अधिकारी (मनरेगा) महेंद्र सपाटे, विस्तार अधिकारी संदीप दिक्षित, आय.ई.सी.तज्ञ अजय राऊत, सुधीर कदम संबंधित विभागप्रमुख सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
The post satara news: सामाजिक स्वयंसेवी संस्था बनणार ‘समृद्ध पंचायतराज अभियान मित्र’ appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











