
मुंबई: लोकसभा निवडणुकीत ‘मिशन ४५ प्लस’ला मोठा धक्का देणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा झटका बसला. या पराभवानंतर आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीने पुन्हा एकदा एकत्र येण्याची मोट बांधली आहे. अंतर्गत वाद आणि कुरघोडी टाळण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभेनंतर अतिआत्मविश्वास नडला –
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी राज्यात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, या यशानंतर आलेल्या अतिआत्मविश्वासामुळे विधानसभा निवडणुकीत मविआची मोठी पिछेहाट झाली. या धक्कादायक निकालानंतर तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आणि टीका-टिप्पणीमुळे तणाव निर्माण झाला होता.
रणनीतीसाठी महत्त्वपूर्ण बैठक –
मंगळवारी झालेल्या या बैठकीला तिन्ही घटक पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections) रणनीती ठरवणे, उमेदवारी वाटप आणि जिल्हास्तरीय समन्वय साधणे हा बैठकीचा मुख्य अजेंडा होता.
आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात सर्व निवडणूका एकजूटीने लढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. pic.twitter.com/mlSxHNmkKQ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 11, 2025
या बैठकीत अंतर्गत वाद टाळण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये काँग्रेसकडून खासदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब यांचा समावेश आहे.
१७ नोव्हेंबरनंतर पुन्हा बैठक होणार –
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना नेत्यांनी आगामी निवडणुकांची तयारी हाच मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली की, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. कोणताही पेचप्रसंग निर्माण झाल्यास ही नवनियुक्त समन्वय समिती त्यावर तोडगा काढेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी १७ नोव्हेंबरनंतर पुन्हा बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसेबाबत भूमिका स्पष्ट –
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “मनसेबाबतचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यावरच चर्चा होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन निवडणुका एकत्र लढलो आहोत आणि समान विचार असणारे पक्ष एकत्र राहावेत, ही आमची भूमिका आहे.”
The post Maharashtra Politics: निवडणुकांच्या तोंडावर ‘मविआ’नं घेतला मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांवर महत्वाची जबाबदारी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











