Shirur News : “बिबट्या वाचवा… पण आम्हालाही जगू द्या” ; बिबट्या-मानव संघर्षाने शिरूर तालुक्यात आक्रोश

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्या-मानव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. पशुधन, लहान मुले आणि माणसांवर हल्ल्यांच्या घटना रोज घडत असताना, वनविभागाने दिलेल्या ‘कंपाऊंड करा’, ‘गटाने काम करा’, ‘टॉर्च वापरा’ अशा सूचना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वास्तवाशी विसंगत ठरत आहेत.

वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यामुळे शेकडो बिबटे या भागात दिवसाढवळ्या फिरत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्या मारला असल्याचे खोटे दाखवून वनविभागाने आपली पाठ थोपटून घेतली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांचा सवाल थेट आहे; औषध फवारणी, गवत काढणे अशा सर्व शेतीच्या कामांसाठी वाकावेच लागते.

मग ‘वाकू नका’ म्हणणाऱ्यांना आमचं काम समजतं का? घरात पुरेसे लोक नसताना ‘गटाने काम करा’ ही सूचना व्यवहार्यता आहे का?”गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासन आणि वनविभागाने फक्त सूचना न देता, प्रत्यक्ष कार्यवाही आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. जर तोच भीतीने वाकला, तर देशाचा कणा मोडेल.

टॉर्च, काठी आणि गाण्यांच्या सूचना अवास्तव..
वनविभागाकडून रात्री टॉर्च वापरणे, गाण्यांचा आवाज करणे, हातात काठी ठेवणे अशा उपायांचा समावेश आहे. मात्र, “हातात काठी घेऊन शेतात काम कसे करायचे आणि दिवसा शेतात काम करताना काय करायचं,” असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या सूचना केवळ कागदावरील उपाय असून ग्रामीण वास्तव, शेतमजुरीची पद्धत आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेतलेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धनगर समाजाची कसरत..
रानात मेंढ्यांसह फिरणाऱ्या धनगर समाजाला दररोज वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकावा लागतो. रानात कुंपण कसं घालायचं? रोज सुरक्षा व्यवस्था कशी करायची? असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान सोसावे लागत असल्याने काही कुटुंबांनी रात्रीच्या वेळी मेंढ्या एका ठिकाणी एकवटणेच बंद केले आहे.

आमची मुलं परत द्या!
गेल्या काही काळात बिबट्यांच्या हल्ल्यांत दोन निष्पाप मुलांचे जीव गेले, ही सर्वात भीषण बाब ठरली आहे. पालकांच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत. “आर्थिक मदत नको… आमची मुलं परत द्या!” असा त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

कंपाऊंडवरून बिबटे आत शिरतात..
शेतकऱ्यांनी घराभोवती कंपाऊंड बांधले तरी बिबट्या दहा फूट उंच भिंती ओलांडून आत शिरतो, असे टाकळी हाजी आणि जांबूत येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

जंगलात फक्त बिबटेच आहेत का?
जंगलात सिंह, तरस, रानगवे, कोल्हे, हरीण असे सर्व प्राणी असताना, फक्त बिबटेच गावात का वाढले, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. वनविभागाने बिबट्यांच्या प्रजननाला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजना केल्याचा, मात्र नुकसानीचा दोष शेतकऱ्यांवरच टाकल्याचा आरोप ते करत आहेत.

आम्ही निसर्गाचे शत्रू नाही!
शेतकऱ्यांचा सूर एकाच दिशेने आहे, आम्ही निसर्गाशी लढत नाही, निसर्गासोबत जगतो. पण आमच्या लेकरांचा जीव वाचवा!

The post Shirur News : “बिबट्या वाचवा… पण आम्हालाही जगू द्या” ; बिबट्या-मानव संघर्षाने शिरूर तालुक्यात आक्रोश appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!