Shashikant Shinde : “अनेक दिग्गज संपर्कात”; शशिकांत शिंदेंच्या गौप्यस्फोटाने साताऱ्याच्या राजकारणात खळबळ

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
सातारा : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही. रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे हे जितके महत्त्वाचे तितकेच निवडणुकीत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने त्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊ, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

येथील राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी शशिकांत शिंदे यांनी स्वतः उमेदवारांशी चर्चा करून बर्‍याचशा निवडी अंतिम केल्याची माहिती आहे.त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सातार्‍यातील सुसंस्कृत वर्ग तसेच तरुण-तरुणी यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगला प्रतिसाद आहे.

इतर मागास प्रवर्गाचे प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीला नाकारून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना साथ देत आहेत. त्याचे प्रतिबिंब सातार्‍यात दिसत आहे. ओबीसीच्या संदर्भाने राज्य शासनाने बरेच उलट सुलट निर्णय घेऊन संभ्रमावस्था निर्माण केली आहे. त्यामुळे या प्रवर्गामध्ये असंतोष आहे. सातारा शहरातही महाविकास आघाडी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून पूर्ण ताकतीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यात यशस्वीपणे पुन्हा आपल्या अस्तित्व निर्माण करेल. भारतीय जनता पार्टी सोडून कोणत्याही समविचारी पक्षांशी आमची युती असणार आहे. स्थानिक समीकरणांना महत्त्व देऊन आणि जनमताचा कानोसा घेऊन जनमान्यतेने उमेदवार दिले जात आहेत, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

अनेक इच्छुक व दिग्गज आमच्या संपर्कात..
सातार्‍याचे बारा वर्शे एकाच ठिकाणी असणारे मुख्याधिकारी तसेच नेत्यांच्या मर्जीतील नगराध्यक्ष अशा विविध प्रश्नांवर बोलते केले असता शशिकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीची जर सत्ता सातार्‍यात आली तर घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही जरूर केली जाईल. नगराध्यक्षपदासाठी तसेच नगरसेवकपदासाठी अनेक इच्छुक व दिग्गज आमच्या संपर्कात आहेत. मात्र बरेच काही आत्ताच सांगता येणार नाही. आपण काही काळ प्रतीक्षा करावी. परिणाम आपल्यासमोर दिसतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

The post Shashikant Shinde : “अनेक दिग्गज संपर्कात”; शशिकांत शिंदेंच्या गौप्यस्फोटाने साताऱ्याच्या राजकारणात खळबळ appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!