Satara Politics : अजित पवार गट जिल्ह्यामध्ये अ‍ॅक्शन मोडवर; मंत्री मकरंद पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
सातारा : पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणामुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजकीय मळभ झटकून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुसंडी मारण्याच्या उद्दिष्टाने अ‍ॅक्शन मोडवर येण्याची भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यात भाजपला टक्कर देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिकेमध्ये अजितदादा गटांनी स्वतंत्र चाचपणी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकांडे शिलेदार असलेले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील या दोन्ही पाटील बंधूंनी जिल्ह्याच्या पश्चिम भागातील विशेषत: गिरीस्थान नगरपालिकांचे राजकारण ढवळून काढायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे सूर जिल्ह्यात मात्र जुळेनासे झाले आहेत.

त्यामुळे महायुतीचा नाद सोडून अजित दादा पवार यांनी सातारा जिल्ह्यातील स्थानिक समीकरणे जोडण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यादृष्टीने मकरंद पाटील यांनी वाई, रहिमतपूर, पाचगणी, महाबळेश्वर या चार नगरपालिकांमध्ये आपले राजकीय कसब पणाला लावले आहे.मकरंद पाटील यांच्या वाई, खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघांमध्ये वाई, पाचगणी, महाबळेश्वर या तीन नगरपालिका येतात. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीची प्रतिष्ठा निश्चितच पणाला लागणार आहे.

कराड उत्तर मध्ये राष्ट्रवादीने मास्टर स्ट्रोक लागवला आहे. ना. मकरंद पाटील यांनी सुनील माने यांचा पक्ष प्रवेश घडवत रहिमतपूर नगरपालिकेची समीकरणे बदलवली आहेत. दुसरीकडे कराड उत्तर चे भाजपचे आ. मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा माने-कदम यांच्या गटाने सुनील माने यांना आव्हान देण्याची तयारी केली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील चार नगरपालिकेत राष्ट्रवादी अजितदादा गटाने स्वतःची ताकद आजमावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याची मोठी मदार आमदार मकरंद पाटील यांच्या खांद्यावर आहे. खासदार नितीन काका पाटील यांनी आपले बंधू मकरंद पाटील यांच्या राजकीय रणनीतीला साथ देत कार्यकर्त्यांची चाचपणी करणे आणि पक्षप्रवेश घडवणे, असा दुहेरी कार्यक्रम सुरू ठेवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अजितदादांना बळ..
भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची वाटचाल होताना ती अधिक दमदार आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक ताकदीसह पुढे यावी, ही अजितदादांची सुप्त इच्छा आहे. कोणे एकेकाळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असणार्‍या अजितदादा पवार यांची जिल्ह्याच्या राजकारणावर आजही तितकीच मजबूत पकड आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील कार्यकर्त्यांची नावे स्मरणामत असणार्‍या अजित दादांचा प्रशासनावर, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच धाक आहे.

त्यामुळे सातारा जिल्हा हा नेहमीच पवारांसाठी प्रतिष्ठेचा राहिला आहे. राज्याच्या राजकारणात सातत्याने अजितदादांना बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न होतो. मात्र अजितदादांच्या राजकारणाची उसळी ही सातारा जिल्ह्यातून होते. त्यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निश्चितच अजितदादा पवार गटासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

The post Satara Politics : अजित पवार गट जिल्ह्यामध्ये अ‍ॅक्शन मोडवर; मंत्री मकरंद पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!