Pune News : ‘प्रोग्रेसिव्ह’ एज्युकेशनकडून पूरग्रस्तांना मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३० लाखांची साहाय्यता

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे –
मराठवाड्यातील भीषण पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपत ३० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी या मदतीचा धनादेश शुक्रवारी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी डॉ. गजानन एकबोटे यांच्‍यासह संस्‍थेचे सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे उपस्थित होत्‍या. या मदतीचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ४५०० हून अधिक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार या मदतनिधीसाठी दिला. पूरग्रस्त बांधवांना मदत करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. संकटाच्या काळात समाजासोबत ठामपणे उभे राहण्याची आमची परंपरा आहे, अशी भावना डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केली.

या उपक्रमाचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिक्षणक्षेत्रातील ४५०० कर्मचाऱ्यांनी सामूहिक भावनेने केलेली ही मदत अत्यंत प्रेरणादायी आहे. ही मदत केवळ निधी नसून, ती संवेदनशीलता, एकजूट आणि समाजाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे. अशा आदर्शांमुळे विद्यार्थ्यांमध्येही समाजसेवेची भावना रुजते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या पुढाकाराचा गौरव केला.

The post Pune News : ‘प्रोग्रेसिव्ह’ एज्युकेशनकडून पूरग्रस्तांना मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३० लाखांची साहाय्यता appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!