Pune District : सासवड-जेजुरी, फुरसुंगी नगरपालिकांत तिरंगी लढत?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

सासवड : जेजुरी आणि फुरसुंगी- उरुळी देवाची या तीन नगरपालिकांच्या निवडणुका आता अत्यंत चुरशीच्या होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुरंदर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपचे प्रमुख नेते असलेले संजय जगताप यांच्या विरोधात पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे व महाविकास आघाडी यांच्याकडून पॅनलची उभारणी केली जाऊ शकते. त्यामुळे राजकीय घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल व उलथापालथ सुरू झाली आहे.

सासवड नगर परिषद निवडणुकीत अनेक वर्ष सत्तेत असलेले माजी आमदार संजय जगताप यांना विरोध करण्यासाठी शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हे सर्व पक्ष एकत्र येण्याची तयारी करत असल्याचे समजते.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शिवतारे यांनी या राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युतीबाबत चर्चा सुरू केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये परस्पर संवाद सुरू आहे. पुरंदरमध्ये संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर “भाजपच्या एकहाती वर्चस्वाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सासवड, जेजुरी, फुरसुंगी उरुळी देवाचीमध्ये माजी आमदार संजय जगताप हे भाजपच्या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
जेजुरी नगरपालिकेत देखील अशीच स्थिती दिसत आहे. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना उघड पाठिंबा देत जेजुरीचे माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे भाजपला एकाकी पाडण्याची रणनीती आखली जात आहे.

शिवतारे आणि पवार या दोन्ही गटांमधील समन्वयामुळे जेजुरीतील निवडणूक समीकरणे पूर्णतः बदलू शकतात. विशेष म्हणजे, जेजुरी परिसरातील अनेक स्थानिक नेते गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या छावणीत दाखल झाले आहेत. विरोधकांनी “स्थानिक विकासाला प्राधान्य देत सर्वपक्षीय आघाडी” उभी करण्याचा विचार मांडला आहे. फुरसुंगी, सासवड आणि जेजुरी या तीनही ठिकाणी संजय जगताप यांच्या नेतृत्वावर थेट आव्हान उभे राहिल्याने भाजपच्या रणनीतीकारांना नव्याने गणित मांडावे लागत आहे.

संजय जगतापांचा विकासाच्या मुद्द्यांवर जोर

तिरंगी लढत होणार असल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे एकत्र येणे म्हणजे सत्ताबदलाचा इशारा” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे, भाजपकडून मात्र संजय जगताप हे विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा जनतेसमोर जाणार असून, विरोधकांकडे फक्त नकारात्मक भूमिका आहे, असा दावा केला जात आहे.

आघाड्यांचा निर्णय लवकरच

नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. सासवड आणि जेजुरी दोन्हीकडे संभाव्य उमेदवारांच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. संजय जगताप यांच्या विरोधात तयार होणाऱ्या या आघाड्या औपचारिक निर्णय पुढील काही दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. सर्व हालचालींमुळे सासवड-जेजुरी आणि फुरसुंगी येथील निवडणुका राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत रूपांतरित होणार आहेत, यात शंका नाही.

The post Pune District : सासवड-जेजुरी, फुरसुंगी नगरपालिकांत तिरंगी लढत? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!