Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात! अपघातात कारचा कोळसा, ७ जणांचा होरपळून जागीच मृत्यू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे- बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा परिसर हादरला. दोन ट्रक ट्रेलर (मल्टी ॲक्सेस व्हेइकल) आणि एका कारचा झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच सात जण जिवंत जळून खाक झाले, तर तब्बल १६ ते १७ जण जखमी झाले. यात कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून दरीपुलाकडे येणारा एक ट्रक उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. नियंत्रण सुटल्याने या ट्रकने समोर असलेल्या आठ ते दहा वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोट आकाशात झेपावले. यादरम्यान, सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने ठोकर दिली. कार पुढे उभ्या दुसऱ्या ट्रकमध्ये अडकली आणि क्षणात जळून खाक झाली.

दोन्ही ट्रकमध्ये कारचा चेंदामेंदा होऊन आग लागली. या कारमधील दोन महिला, दोन पुरुष आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. मागील ट्रक चालक आणि त्याचा क्लिनर यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत वाहनांचे केवळ सांगाडेच उरले होते.

रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने तब्बल सात मृतदेह बाहेर काढले, तर २२ जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सातारा आणि मुंबईच्या दिशेने महामार्गावर सात ते आठ किलामीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच साताऱ्याकडून येणारी वाहतूक जुन्या कात्रज बोगदा मार्गाने वळवली.

घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.या परिसरात याआधीही अनेक अपघात घडले असून, स्थानिक नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. या वेळी नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

विदारक दृश्‍य..
आगीच्या आणि धुराच्या लोटांमुळे काही काळ परिसरात दृष्टीसुद्धा कमी पडत होती. बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष, आणि मृतांच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश्य पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. दरम्यान, कार दोन्ही ट्रकमध्ये चेपल्याने नंबर प्लेट आणि चॅसी नंबर दिसत नाही. यासाठी कार सातारा रस्त्याने जेथून आली त्या मार्गापर्यंत सीसीटीव्ही तपासले जात आहेत. जेणेकरून गाडीची नंबर प्लेट दिसून त्याद्वारे गाडी मालकाची ओळख पटू शकेल. यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.

मृतांची प्राथमिक माहिती..
कारमध्ये स्वाती नवलकर, तिचे वडील दत्तात्रय दाभाडे, आई शांता दाभाडे आणि शेजारी राहणारी मुलगी मोक्षिता रेड्डी (सर्व रा. चिखली) हे कारचालक धनंजय कोळी (रा. बीड) याच्यासह नारायणगावला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या कळाल्याचे उपायुक्त (गुन्हे) निखिल यांनी सांगितले.

“कार आणि ट्रकमधील मृतदेहांचे कोळसे झाले होते. त्यामुळे त्यांची खरी ओळख पटणे अवघड आहे. यासाठी डीएनए टेस्ट करावी लागेल. त्यासाठी पोलिसांंनी नमुने घेतले आहेत.”
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

“अग्निशमन दलाचे जवान कारची आग आटोक्यात आणत असतानाच, कारमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे कारमध्ये सीएनजी असल्याची शक्यता वाटत आहे.”
– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

“पुण्यातील नवले पुलाजवळ झालेला भीषण अपघात, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून, मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.”
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

The post Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात! अपघातात कारचा कोळसा, ७ जणांचा होरपळून जागीच मृत्यू appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!