
सांगली : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे आणि स्पष्ट निर्देश दिले आहेत. सत्तेत चांगला वाटा मिळणार असेल आणि पक्षाला फायदा होणार असेल, तरच महायुतीतील घटक पक्षांशी युती करा; अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा आणि तसा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगलीतून पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, उपाध्यक्ष विष्णू माने, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राजेंद्र देशमुख, तमणगोंडा रविपाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
‘स्वबळावर’ जास्तीत जास्त जागा जिंकण्याची शक्यता असेल, तर स्वतंत्र लढा
या बैठकीत बोलताना पक्षप्रमुख पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्थितीची माहिती घेतली. ज्या ठिकाणी महायुतीमुळे पक्षाला अधिक फायदा होऊन सत्तेत चांगला वाटा मिळू शकेल, तेथे घटक पक्षांशी युती करावी. मात्र, ज्या ठिकाणी अधिकाधिक जागा स्वबळावर जिंकण्याची शक्यता आहे, तेथे कोणत्याही दबावाशिवाय स्वबळाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्तरावरील राजकीय परिस्थिती आणि पक्षाची ताकद पाहून युती करायची की स्वतंत्र लढायचे, याचा अंतिम निर्णय पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
भाजपकडून विटा, तासगावसाठी मुलाखती सुरू
दरम्यान, अजित पवार गटाच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपनेही सांगली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. भाजपने विटा आणि तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत.
भाजपचे ग्रामीण प्रभारी आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी इच्छुकांशी उमेदवारीबाबत चर्चा केली. विटा येथे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही मुलाखतीवेळी उपस्थित होते.
विटा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासह २७ जागांसाठी ७२ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तासगाव नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याची रणनीती निश्चित केली असून, त्यानुसार इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्देशानंतर सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे चित्र नेमके काय राहते आणि स्थानिक पदाधिकारी स्वबळाचा निर्णय घेतात की युतीचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The post ‘फायदा’ असेल तरच ‘युती’, अन्यथा ‘स्वबळावर’ लढा – अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











