पानशेतच्या ओसाडे येथे गावठी दारुची हातभट्टी उध्वस्त; एकास अटक, वेल्हे पोलिसांची कारवाई

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

वेल्हे: पानशेत रस्त्यावरील ओसाडे (ता. राजगड) येथील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगत सुरू असलेला बेकायदा गावठी दारू तयार करणारा मोठा हातभट्टीचा अड्डा वेल्हे पोलिसांनी धाड टाकून उध्वस्त केला आहे. या कारवाईत बच्चन मेरु नानवत (वय ३५, रा. ओसाडे) यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल, शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास मुनवाॅक हॉटेलजवळ, पाणलोट क्षेत्राच्या दलदलीतील झाडाझुडुपांत ही धाड टाकली. यावेळी दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात ठेवलेले दोन बॅलर व एका प्लॅस्टिकच्या टाकीत मिळून तब्बल दोनशे लिटर गावठी दारू तसेच नवसागर, गूळ, तुरटी आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा मोठा साठा आढळला.

जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे २४ हजार रुपये आहे. यापूर्वीही वेल्हे पोलिसांनी या ठिकाणी अनेकदा कारवाई केली असून, धरणात पोहत पलायन करणाऱ्या हातभट्टी चालकाला पोलिसांनी धरणातच जेरबंद केल्याची घटनाही घडली होती. वारंवार कारवाई करूनही राजरोसपणे हातभट्टी सुरू असल्याचे निष्पन्न झाल्याने, सुधारित कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांनी सांगितले.

The post पानशेतच्या ओसाडे येथे गावठी दारुची हातभट्टी उध्वस्त; एकास अटक, वेल्हे पोलिसांची कारवाई appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!