नोंदणी विभागाचा मोठा निर्णय; ‘या’ कागदपत्रांची नोंदणी करण्यास आता स्पष्ट मनाई, वाचा सविस्तर

registration
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे –
मुंढवा आणि ताथवडे येथील शासकीय जागांची खरेदी-विक्रीचा दस्त नोंदविल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभागाने अशा प्रकरणांची गंभीरतेने दखल घेतली आहे. त्यानुसार दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदविताना काय खबरदारी घ्यावी, याबाबतचे परिपत्रक सह जिल्हा निबंधक यांनी जारी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने दस्तनोंदणी करताना सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डवरील शेरे वाचूनच अधिनियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

तसेच, जर सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डवर काही प्रतिबंधात्मक शेरे असतील तर संबंधित शासकीय संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय दस्ताचे नोंदणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सर्व दुय्यम निबंधकांना दिले आहेत.राज्य शासनाच्या राजपत्र २८/०४/२०२५ नुसार, ‘नोंदणी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०२३’ अस्तित्वात आला असून, नोंदणी अधिनियम १९०८ मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

या नवीन तरतुदींमुळे आता काही विशिष्ट दस्तऐवजांची नोंदणी नाकारणे बंधनकारक झाले आहे. दस्तऐवज नोंदणी करताना सातबारा उताऱ्यावर अथवा प्रॉपर्टी कार्डवरील शेरे काळजीपूर्वक वाचावेत आणि नवीन अधिनियमाचा भंग होणार नाही याची खात्री करावी. तसेच जर सातबारा उताऱ्यावर अथवा प्रॉपर्टी कार्डवर कोणतेही खरेदी-विक्रीस बंदीचे प्रतिबंधात्मक स्वरूपाचे शेरे नमूद असतील, तर संबंधित प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय दस्तऐवज नोंदणी करू नये.

तसेच, दस्तऐवज नोंदणी करताना सातबारा उतारा आणि झोन दाखला अद्ययावत असल्याची खात्री करावी. तसेच, नोंदींमध्ये म्युटेशन स्किप न करता दस्तऐवज नोंदणी केली जावी. नोंदणी विभागाने सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना वरील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, या सुधारणांमुळे सरकारी जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

या दस्तऐवजांची नोंदणी करण्यास स्पष्टपणे मनाई
– कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे ज्या व्यवहारांना मनाई आहे, अशांशी संबंधित दस्तऐवज.
– केंद्र किंवा राज्य सरकारची किंवा त्यांच्या कोणत्याही प्राधिकरणाची अथवा उपक्रमाची मालकी असलेल्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित दस्तऐवज. केवळ सांविधानिकदृष्ट्या अधिकार असलेल्या व्यक्तीने निष्पादित केलेला दस्तऐवज वगळता इतर कोणत्याही व्यक्तीने निष्पादित केलेला दस्तऐवज नोंदणीस नाकारला जाईल.
– सक्षम प्राधिकरणाने, न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित दस्तऐवज.

या मालमत्तेचा समावेश निगेटिव्ह लिस्टमध्ये करा.
ताथवडे (ता. मुळशी) येथील सर्व्हे क्रमांक २० या मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांमध्ये मा. आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असे शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी, अशी स्पष्ट नोंद असतानाही, सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र. १७ यांनी दस्त क्र. ६८५/२०२५ या दस्ताची नोंदणी केली.

या पार्श्वभूमीवर ताथवडे येथील सर्व्हे नं. २० या मिळकतीचे पुढील कोणत्याही स्वरूपाचे दस्तऐवज महसूल किंवा पशुसंवर्धन विभागाच्या परवानगीशिवाय नोंदणी करण्यात येऊ नयेत. तसेच, या मिळकतीचा समावेश निगेटिव्ह लिस्टमध्ये तत्काळ करण्यात यावा, असे आदेश सह जिल्हा निबंधक यांनी सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 17 यांना दिला आहे.

The post नोंदणी विभागाचा मोठा निर्णय; ‘या’ कागदपत्रांची नोंदणी करण्यास आता स्पष्ट मनाई, वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!