अग्रलेख : दिल्ली स्फोटाचे आव्हान

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली काही वर्षे जम्मू-काश्मीरचा भाग सोडला तर देशात दहशतवादी घटना घडली नव्हती. त्यामुळे देशातील दहशतवादाचे आव्हान पूर्ण नियंत्रणात आल्याचे जे एक वातावरण निर्माण झाले होते त्या वातावरणालाच या स्फोटामुळे तडा गेला आहे. ही घटना घडून बरेच तास उलटूनही या स्फोटाच्या संबंधातील नेमकी माहिती सरकार किंवा तपास यंत्रणांकडून अजून मिळू शकलेली नाही. हा आत्मघाती दहशतवादी हल्ला होता किंवा कसे हे अजून नेमकेपणाने स्पष्ट व्हायचे आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

या तपास अधिकार्‍यांनी काही संशयित ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीवर विश्‍वास ठेवला तर कोणी डॉक्टर मोहम्मद उमर नावाच्या एका इसमाने हा आत्मघाती स्फोट घडवून आणला असून या स्फोटाच्या कटामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखीन तीन डॉक्टर सामील असल्याचे सांगितले गेले आहे. अमोनियम नायट्रेटचा वापर करून हा स्फोट घडवून आणला गेला आहे. त्यामुळे हे दहशतवादी कृत्यच होते हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ज्या कारमधून हा स्फोट झाला ती कार डॉ. मोहम्मद उमर नावाचा माणूस चालवत होता आणि त्यात तोही मरण पावल्याने हा आत्मघाती दहशतवादी हल्ला होता असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

याचा नेमका तपशील अधिकृतपणे लवकरच जाहीर होईल, पण देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हा स्फोट घडवण्यामागे संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देण्याचा डाव संबंधित संघटनांनी साधला आहे, असे म्हणायला वाव आहे. या विषयावरून अजून राजकारण सुरू झालेले नसले, तरी ज्या दिवशी बिहार विधानसभेच्या मतदानाचा दुसरा टप्पा होणार होता त्याच्या आदल्याच दिवशी हा स्फोट झाल्याने पुन्हा त्या अनुषंगाने काही उलटसुलट शंका-कुशंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. सुदैवाने अजून विरोधी पक्षांनी याविषयी कोणतेही संवेदनशील वक्तव्य दिलेले नाही. तपास यंत्रणांकडून नेमके स्फोटाचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतरच यावर काही भाष्य करणे उचित ठरेल, अशी समजुतीची भूमिका विरोधी पक्षांकडून घेतली गेली आहे. दिल्लीत झालेला हा स्फोट एकुणातच काही चांगले लक्षण मानता येणार नाही.

दिल्लीत हा स्फोट व्हायच्या आधी गुजरात आणि देशाच्या अन्य काही भागांत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले गेले होते, तब्बल 2900 किलो स्फोटकेही तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली होती. म्हणजे तपास यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे आणि त्यांचे संशयित दहशतवाद्यांच्या हालचालीवर पूर्ण नियंत्रण आणि लक्ष आहे, असे संकेत या कारवाईतून मिळालेले असतानाच थेट दिल्लीत स्फोट होण्याच्या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागते. दिल्लीतल्या स्फोटात वापरली गेलेली कार हरियाणातील आहे आणि ती कार खरेदी करणारा डॉक्टर मोहम्मद उमर आणि त्याच्याशी संबंधित लोक विविध राज्यांमधील रहिवासी आहेत, असे अनेक धागेदोरे या तपासात आतापर्यंत मिळाले आहेत आणि त्यांचे एकमेकांशी असलेले कनेक्शन जोडण्याचे काम सध्या सुरू आहे.

त्यानंतर दिल्लीतल्या घटनेबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होईल हे जरी खरे असले, तरी देशातील सुरक्षा व्यवस्थेपुढचे दहशतवाद्यांचे आव्हान आता काश्मीरची सीमा ओलांडून मुख्य भूमीकडे आले आहे हे लक्षात येते. आता यामागे धार्मिक ध्रुवीकरणातून किंवा धार्मिक विद्वेषातून घातपाती कारवाया करणारे लोक आहेत किंवा कसे हा अँगलही तपासावा लागणार आहे. देशात अनेक ठिकाणी दहशतवादी कारवायांचा कट उघडकीला येणे आणि दोन-तीन हजार किलो स्फोटके त्यांच्याजवळ असणे हे काही साधे लक्षण नाही. गेल्या अनेक वर्षांत देशात मोठा दहशतवादी हल्ल्याचा प्रकार घडलेला नव्हता.

यापूर्वीच्या पहेलगाम, पुलवामा, उरी येथे ज्या दहशतवादी घटना घडल्या त्या केवळ जम्मू-काश्मीर या राज्याच्या हद्दी पुरत्याच सीमित होत्या. पण आता देशाच्या मुख्य भूमीत हे दहशतवादाचे आव्हान पुन्हा नव्याने उभे राहात आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वच पातळीवरील सरकारी यंत्रणांना अनेक अंगाने विचार करून उपाययोजना करावी लागणार आहे. देशात निवडणुकांच्या अंगाने जे राजकारण होते त्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक किंवा जातीय विद्वेषाचा वापर केला जातो आणि हे प्रकार अनेक वेळा मर्यादेच्या बाहेर जाताना दिसतात. त्याचे समाज मनावर गंभीर परिणाम होत असतात हा मुद्दा आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही.

त्यामुळे राजकारण करताना किंवा निवडणुकांच्या प्रचाराची रणनीती ठरवताना हा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे ठरते. दिल्लीतील स्फोटाच्या संबंधात संशयित म्हणून जी काही नावे समोर आली आहेत त्यात चौघेजण डॉक्टर असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे उच्चशिक्षित लोकांकडून जर अशा स्वरूपाची देशाला आव्हान देणारी दहशतवादी घटना घडत असेल तर त्याचेही वेगळे पैलू समोर येतात ते गांभीर्याने तपासले पाहिजेत. आतापर्यंत असे सांगितले जात होते की एका विशिष्ट समाजातल्या बेरोजगार किंवा गरीब युवकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढले जात आहे, पण जेव्हा संशयितांमध्ये चौघे डॉक्टर आढळून येतात त्यावेळेला हा युक्तिवाद खोटा ठरतो. त्यामुळेच या स्फोटाच्या घटनेचे आव्हान कल्पनेपेक्षा मोठे आहे हे जाणवते.

The post अग्रलेख : दिल्ली स्फोटाचे आव्हान appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!