
हिंगोली – सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शंकर पट स्पर्धेत हिंगोली जिल्ह्याच्या दांडेगाव येथील साईनाथ कऱ्हाळे यांच्या ‘सर्जा’ या बैलाने इतिहास घडवला आहे. सर्जाने आपल्या वाऱ्याच्या वेगाच्या आणि अविश्वसनीय दमदार खेळीच्या जोरावर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले, ज्यामुळे त्याच्या मालकाला फॉर्च्यूनर कार, मानाची चांदीची गदा आणि एक दुचाकी अशी भव्य बक्षिसे मिळाली आहेत. या दिमाखदार यशामुळे ‘सर्जा’ बैलाचे कौतुक आज संपूर्ण मराठवाड्यात होत आहे.
थरार! 500 बैलजोड्यांना धूळ चारत सर्जा-लखन जोडीची बाजी –
यावर्षीची शंकर पट स्पर्धा अत्यंत थरारक आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. देशभरातून 500 हून अधिक नामांकित बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दांडेगाव (हिंगोली) येथील सर्जा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील गुप करोडी येथील सारंगगाव चव्हाण यांच्या ‘ट्रिपल हिंदकेसरी’ लखन या जोडीने सुरुवातीपासूनच जबरदस्त गती राखली. प्रतिस्पर्धकांना मागे टाकत या जोडीने अंतिम फेरीत अप्रतिम ‘घेप’ घेतली आणि पहिला क्रमांक पटकावला.
मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान! –
या ऐतिहासिक विजयानंतर आज मंत्रालयात भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साईनाथ कऱ्हाळे यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः कऱ्हाळे यांनी दिली आहे.
वर्षापूर्वी 4.50 लाखांना खरेदी! रोज 10 लिटर दूध, काजू-बदामाचा खुराक
दांडेगाव येथील साईनाथ कऱ्हाळे व करण कऱ्हाळे यांनी सुमारे एक वर्षापूर्वी सर्जाला 4.50 लाख रुपयांमध्ये नाशिक जिल्ह्यातून खरेदी केले होते. तेव्हापासून त्याला शंकरपट आणि बैलगाडा स्पर्धेसाठी तयार केले जात होते.
सर्जाच्या या दमदार कामगिरीमागे त्याच्या उत्तम संगोपनाचा आणि खुराकाचा मोठा हात आहे. सर्जाला दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी 10 लिटर दूध, बदाम आणि काजू यांचा विशेष खुराक दिला जातो. या मेहनतीमुळेच सर्जाने मागील एका वर्षात हिंगोली, परभणी, नांदेड, वाशीम भागातील शंकरपट स्पर्धा गाजवून 40 पेक्षा अधिक पारितोषिके पटकावली असल्याचे कऱ्हाळे यांनी सांगितले.
ग्रामीण महाराष्ट्रात पारंपारिक संस्कृतीचा जयघोष!
दुर्गम भागातून आलेल्या सर्जाच्या या यशामुळे केवळ दांडेगाव नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे. ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पारंपरिक बैल संस्कृतीचा जयघोष झाला आहे. सर्जाने यापूर्वीही विविध ठिकाणी तीन वेळा हिंदकेसरी म्हणून मान मिळवला आहे.
साईनाथ कऱ्हाळे आणि त्यांच्या सर्जा बैलाने दांडेगावसह संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यामुळे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
The post हिंगोलीच्या सर्जाचा डंका! दांडेगावच्या ‘या’ बैलाने मालकाला बनवले फॉर्च्यूनरचा धनी! appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











