रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनीच चालवला जेसीबी; पुसेगावात रखडलेल्या महामार्गासाठी स्वतःहून घेतला पुढाकार

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुसेगाव – सातारा म्हसवड टेंभुर्णी- लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी सकारात्मकता दाखवली आहे. स्वतःहून मालकीच्या जागेवर जेसीबी चालवून रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. सकाळी ११ वाजता मारुती मंदिरासमोर सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी व गावातील विविध तरुण मंडळांनी रास्ता रोको आंदोलनाचा एल्गार पुकारल्याने सुमारे दोन तास पुसेगावातील वाहतूक ठप्प झाली होती.

या आंदोलनादरम्यान पुसेगावात रखडलेल्या रस्त्याच्या कामाला ग्रामस्थांची साथ मिळाली. स्वतःहून मालकीच्या जागेवर जेसीबी चालवून रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेपूर्वी ता. १० डिसेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन प्रशासन आणि संबंधित कंपनीने दिले आहे.

खटाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या पुसेगावातून गेलेल्या सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार वर्षांपासून सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवाळीतील आठ दिवस आणि सध्याच्या वाहतूक कोंडीने नागरिक आणि प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी शिवसेनेचे प्रताप जाधव, ईगल ग्रुपचे अध्यक्ष सुसेन जाधव, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पुसेगावात रास्ता रोको आंदोलनाचा बडगा उगारला होता.

गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळे यांनी वेळोवेळी या रस्त्याचे काम पाहणाऱ्या कंपनी विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण केले. मात्र, याचा काहीही परिणाम दिसून येत नव्हता, त्यामुळे काही ग्रामस्थांनी विनामोबदला घेत गावच्या विकासासाठी सिटी सर्व्हेला नोंद असताना देखील आपली स्वमालकीची जागा जेसीबीच्या साह्याने मोकळी करून दिली.

यामध्ये देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रणधीर जाधव, शेखर जाधव, सचिन विक्रम जाधव, माजी प्राचार्य टी. एन. जाधव, कुमार जाधव यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपली रस्त्यालगतची जागा गावाच्या विकासासाठी सोडून दिली, तसेच मंदिरापासून डॉ. सुरेश जाधव यांच्या हॉस्पिटलपर्यंत रस्त्यालगतच्या अनेक ग्रामस्थ आणि दुकानदारांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच पुसेगावातील वाहतूक समस्या निकालात निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात आमदार महेश शिंदे, एमएसआरडीसीच्या अभियंता घोडके यांनी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बाधित ग्रामस्थांची देवस्थान ट्रस्टमध्ये संयुक्त बैठक घेतली. तातडीने या रस्त्याच्या वाहतूक कोंडीबाबत यात्रेपूर्वी तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे सुमारे दोन तीन तास झालेली वाहतूक कोंडी आणि त्याचे योग्य व्यवस्थापन पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण व कर्मचाऱ्यांनी केल्याने प्रवाशांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

वाहतूक कोंडीचा त्रास :

कित्येकदा रुग्णवाहिका, आमदार, खासदार, मंत्री यांना पुसेगावातील वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सोसावा लागला आहे. रस्त्याच्या कामाबाबत कित्येकदा आंदोलने करूनही सदर कंपनी सतत टाळाटाळ करून कोणतीही ठोस भूमिका घेण्याच्या मानसिकतेत नव्हती. प्रशासनाची ही उदासीन भूमिका ग्रामस्थांच्या लक्षात आली.

The post रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनीच चालवला जेसीबी; पुसेगावात रखडलेल्या महामार्गासाठी स्वतःहून घेतला पुढाकार appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!