विशेष : शिक्षण – आव्हाने आणि दिशा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

– प्रा. डॉ. सुभाष राठोड

दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त औपचारिक नाही; तो शिक्षणाच्या मूलभूत उद्दिष्टांचा, मूल्यांचा आणि दिशा निश्‍चित करण्याचा दिवस आहे.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. मौलाना आझाद हे स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणविचारांचे प्रणेते, प्रभावशाली लेखक, पत्रकार आणि वक्ते होते. त्यांच्या जीवनात राष्ट्राची एकता, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेचे तत्त्व नेहमीच केंद्रस्थानी होते. त्यांच्या विचारांतून हे स्पष्ट होते की, शिक्षण केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे.

किशोरावस्थेतच देशभक्तीची जाणीव त्यांच्यात रुजली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. गांधीजी आणि नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धार्मिक असहिष्णुतेविरोधी प्रयत्न केले आणि स्वातंत्र्यानंतर शिक्षणव्यवस्थेला आधुनिक, सर्वसमावेशक आणि राष्ट्रनिर्मितीला चालना देणारे स्वरूप दिले.

मौलाना आझाद यांच्या दृष्टिकोनात शिक्षण हे समाजातील सकारात्मक बदलाचे, लोकशाही व उदारमतवादी मूल्यांचा प्रसार करणारे आणि राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राची खरी शक्ती त्याच्या कारखान्यांमध्ये नाही, तर शाळांमध्ये आहे. त्यांनी शिक्षण सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला, उच्च शिक्षणात संशोधन, प्रयोगशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक प्रगतीला प्रोत्साहन दिले.

आज शिक्षणाचा व्याप जरी खूप वाढला असला तरी त्याचा मूळ हेतू कितपत साध्य झाला आहे, हा विचार करणे गरजेचे आहे. डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिकीकरण यासारखी साधने उपलब्ध असली तरी मानवी मूल्ये, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी तेवढ्या प्रमाणात टिकली आहेत का? ज्ञानाचा प्रसार होतोय, पण मूल्यांचा समतोल राखणे हेच खरे आव्हान आहे.

शिक्षण आज केवळ रोजगारनिर्मितीपुरते मर्यादित राहिलेले दिसते. व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जबाबदारी, चारित्र्यनिर्मिती याला तितकेच महत्त्व दिले पाहिजे. स्पर्धात्मक वातावरण, केवळ परीक्षांना अधोरेखित करणारी पद्धत, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे, यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ्य धोक्यात येते. शिक्षकांच्या भूमिका केवळ ज्ञान देण्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर विचारशक्ती, आत्मविश्‍वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ही आझादांच्या तत्त्वांची आधुनिक रूपरेषाच म्हणावी लागेल. बहुभाषिकता, कौशल्याधारित अभ्यासक्रम, अनुभवाधारित शिक्षण, स्थानिक संस्कृतीचा सन्मान, समावेशी शिक्षण, दिव्यांग विद्यार्थी, अल्पसंख्याक समुदाय, बालकामगार, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जमातींना मुख्य प्रवाहात आणणे यावर भर आहे. धोरणाचे यश वर्गखोल्यांमध्ये प्रामाणिकपणे अंमलात आणण्यावर अवलंबून आहे.

तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा विस्तार झपाट्याने झाला असून ऑनलाइन व्याख्याने, डिजिटल साधने आणि आभासी वास्तव पारंपरिक वर्गखोल्यांना व्यापत आहेत. मात्र ज्ञान मिळणे सोपे झाले तरी मानवी मूल्ये, चारित्र्य आणि सामाजिक जबाबदारी टिकवणे हेच खरे आव्हान आहे. संगणक ‘डेटा’ देतो, पण शिक्षक ‘दिशा’ देते; ऑनलाइन व्याख्याने माहिती पुरवतात, पण शिक्षक विचारसरणी आणि विवेक जागवतात.

शिक्षण फक्त करिअर घडविण्याचे साधन नसून, राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक समतेचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया असावा. मौलाना आझाद यांच्या दृष्टिकोनात शिक्षणाने विचारांना स्वतंत्रता, संवेदनांना मृदुता आणि कृतीत जबाबदारी रूजवली, तरच राष्ट्रनिर्मिती साध्य होते.

शिक्षकांची भूमिका आज अधिक व्यापक आणि आव्हानात्मक आहे. ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना विचारशक्ती, आत्मविश्‍वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव देणे गरजेचे आहे. माहितीच्या महासागरात सत्य आणि असत्य यामधील सीमारेषा धूसर होत आहे. अशा वेळी संस्कारक्षम शिक्षणाचा दीप विवेकाचा मार्ग उजळवू शकतो. खरी विद्या माणसाला अज्ञान, भीती आणि अन्यायाच्या अंधारातून मुक्त करते.

राष्ट्रीय शिक्षण दिन आत्मपरीक्षणाचे निमित्त आहे. आपण शिक्षण घेतोय ते जीवन घडवण्यासाठी आहे की केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी? ज्ञानाचा दीप फक्त विवेक, मूल्ये आणि मानवतेच्या तेलाने प्रज्वलित राहील, तरच त्याचा प्रकाश सुसंस्कृत, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवेल.

विद्या विनय, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करते, ही शिकवण आजच्या काळात अधिक आवश्यक आहे. ग्रामीण, आदिवासी, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे ही केवळ सरकारी जबाबदारी नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामाजिक बांधिलकी आहे.

मौलाना आझाद यांनी मांडलेले ‘सर्वांसाठी शिक्षण’ आजही अधिक अर्थपूर्ण आहे. राष्ट्रीय शिक्षण दिन केवळ स्मरणदिन नाही, तर शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शिक्षणाच्या उद्दिष्टांची आणि मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचा दिवस आहे. शिक्षणाला मानवतेचा पूल बनवावे, मूल्यांचा आधार असावा आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रगल्भ साधन ठरावे, हाच या दिवसाचा संदेश आहे.

आज शिक्षण प्रणालीला शहरी-ग्रामीण दरी, डिजिटल विभाजन, गुणवत्तेतील असमानता, प्रशासकीय कामाचे ओझे आणि पालकांच्या अपेक्षांचा ताण यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या आव्हानांना उत्तर देण्यासाठी लवचिक, कौशल्याधारित, अनुभवाधारित, बहुभाषिक आणि स्थानिक संस्कृतीशी निगडित शिक्षणाची रूपरेषा तयार करते.

मौलाना अबुल कलाम आझाद हे दूरदर्शी नेता आणि आधुनिक भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेचे शिल्पकार. त्यांनी शैक्षणिक समानतेचे तत्त्व, उच्च शैक्षणिक मानके, सांस्कृतिक शिक्षण आणि सामाजिक ऐक्य यांना प्रोत्साहन देणारी धोरणे राबवली.

भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि साहित्य अकादमी यांच्या स्थापनेसह, त्यांच्या शिक्षणदृष्टीने देशाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रगतीत चिरस्थायी योगदान राहिले. त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. विचारांना स्वतंत्रता, संवेदनांना मृदुता, कृतीत जबाबदारी आणि समाजात समता रुजवणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.

The post विशेष : शिक्षण – आव्हाने आणि दिशा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!