पार्थ पवारांच्या कंपनीचा दुसरा ‘भूखंड’ प्रताप! मुंढव्यानंतर आता बोपोडीत ५ हेक्टर सरकारी जमीन हडपली,नऊ जणांवर गुन्हा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारानंतर आता पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. बोपोडी येथील शासनाच्या मालकीच्या ५ हेक्टर जमिनीचा अपहार करून बेकायदेशीररीत्या खासगी ताबा दर्शविल्याप्रकरणी खडक पोलिसांत पुणे शहर तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे (वय ५०) यांनी सरकारतर्फे अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे.

त्यावरून पोलिसांनी पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले, तसेच व्हिजन प्रॉपर्टीतर्फे कुलमुखत्यारधारक राजेंद्र रामचंद्र विध्वंस (रा. सकाळनगर, बाणेर रोड), ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदोर, मध्यप्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. कुलाबा, मुंबई), शीतल किसनचंद तेजवाणी, आणि अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीचे संचालक दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर फसवणूक, संगनमत आणि सरकारी मालमत्तेचा अपहार केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

हा संपूर्ण प्रकार १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ दरम्यान खडकमाळ येथील मामलेदार कचेरीत घडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. हा गुन्हा ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ४१ मिनिटांनी नोंदविण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील ५ हेक्टर ३५ आर जमीन १८८३ पासून कृषी विभागाच्या ताब्यात आणि वहिवाटीत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती जमीन शासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट असतानाही, तहसीलदार येवले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ‘मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८’ महापालिका क्षेत्रात लागू नसतानाही त्याचा आधार घेत बेकायदेशीर आदेश तयार केले.

या संगनमतातून व्हिजन प्रॉपर्टीतर्फे अर्जदार हेमंत गवंडे व त्यांचे प्रतिनिधी राजेंद्र विध्वंस आणि अन्य जणांनी सरकारी जमिनीवर मालकी हक्क दाखविणारा बनावट आदेश तयार केला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, शासनाची फसवणूक आणि जमीन अपहाराच्या गंभीर आरोपांवरून अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

The post पार्थ पवारांच्या कंपनीचा दुसरा ‘भूखंड’ प्रताप! मुंढव्यानंतर आता बोपोडीत ५ हेक्टर सरकारी जमीन हडपली,नऊ जणांवर गुन्हा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!