जेजुरीत राजकीय रणधुमाळी! ‘आघाडी’ विरुद्ध भाजपची ‘एकला चलो रे’ भूमिका ; राजकीय समीकरणे चुरशीला

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
जेजुरी – धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागली आहे. निवडणुकीची घोषणा होताच सर्व राजकीय पक्षांनी आपल्या हालचालींना वेग दिला असून या निवडणुकीत ‘तुतारी-घड्याळ-धनुष्यबाण’ आघाडी विरुद्ध भाजपाची ‘एकला चलो रे’ भूमिका अशी थरारक लढत रंगण्याची चिन्हे आहेत.निवडणूक आयोगाने दहा प्रभागांतील 20 नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

शहरातील एकूण मतदारसंख्या 15, 800 असून त्यात 7, 583 पुरुष, 8, 215 महिला आणि 2 इतर मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 10 ते 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांमध्ये आघाडीची चर्चा सुरू असून निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शनिवारी (दि. 8) पुण्यातील बैठकीत घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या आघाडीतून दिलीप बारभाई, जयदीप बारभाई, गणेश निकुडे, रोहिदास कुंभार हे प्रमुख नेते समन्वयाची भूमिका निभावत आहेत. आमदार विजय शिवतारे यांची भूमिकाही या समीकरणात निर्णायक ठरणार आहे.दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष आणि देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी थेट मैदानात उतरत मल्हारी मार्तंड हाच माझा पक्ष, आणि जेजुरीकर बांधव हाच माझा पॅनल या घोषवाक्याने प्रचाराला प्रारंभ केला आहे.

जगताप यांनी 14 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले असून ते राष्ट्रवादी (अजितदादा गट) कडून उमेदवारीसाठीही चाचपणी करत आहेत. शहरात त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांचे उमेदवारीवर मोठे लक्ष केंद्रित झाले आहे.जेजुरीत सध्या आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत असली तरी, स्वतंत्र उमेदवार आणि स्थानिक गटांची हालचाल निवडणुकीचे चित्र बदलू शकते.

सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार आता वरिष्ठांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. शनिवारी पुण्यात अजितदादा पवार यांच्याशी होणार्‍या बैठकीनंतरच जेजुरी नगरपरिषद निवडणुकीचे नेमके राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपाची ‘एकला चलो रे’ भूमिका..
माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार टेकवडे आणि बाबा जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने उमेदवारांच्या बैठका सुरू केल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपातून सुधीर गोडसे, अजिंक्य जगताप-देशमुख, सचिन सोनवणे आणि सचिन पेशवे ही नावे चर्चेत आहेत. पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून एकला चलो रेच्या भूमिकेत प्रचारयंत्रणा सज्ज झाली आहे.

नगराध्यक्षपदासाठी आघाडीकडून कोण?
आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी जयदीप बारभाई आणि गणेश निकुडे ही नावे आघाडीवर आहेत. या पदाचे आरक्षण यावेळी सर्वसाधारण असल्याने दोन्ही गटांतून अनेक दावेदार सक्रिय झाले आहेत.

The post जेजुरीत राजकीय रणधुमाळी! ‘आघाडी’ विरुद्ध भाजपची ‘एकला चलो रे’ भूमिका ; राजकीय समीकरणे चुरशीला appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!