१) राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस”; बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील म्हणाले होते.
त्यांच्या या विधानावर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला मी एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देईन,” अशी धक्कादायक घोषणा बच्चू कडू यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. एवढंच नाही तर “मला विखे पाटलांची गाडी कुठे दिसली तर मी स्वतः हातात दगड घेऊन फोडीन,” असा उघड इशारा त्यांनी दिला आहे.
२) मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या; शरद पवारांचा मोठा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या, ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या, अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी पक्षातील आमदार, खासदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत युती नकोच असं पुन्हा एकदा शरद पवार यांनी या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
३) वाढदिवसाच्या २३० कोटी शुभेच्छा; मुरलीधर मोहोळांना धंगेकरांचा खोचक टोला
मागील महिन्यात पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग हाउसच्या जमीनीचा विक्री व्यवहार चांगलाच चर्चेत होता. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या जमिनीचा खरेदी व्यवहार केला होता. त्यावरून शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप केले. अखेर धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, व्यवहार रद्द झाल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी या घटनेचा उल्लेख करत एक्सवर एक पोस्ट केली आहे. मुरलीधर मोहोळ यांचा आज ५१ वा वाढदिवस असल्याने रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना मोहोळ यांना चिमटा काढला आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की “हॅपी बर्थडे बरं का…! वाढदिवसाच्या २३० कोटी शुभेच्छा..! जय जिनेंद्र.”
४) राष्ट्रवादीची अशी औलाद, जी सत्तेशिवाय राहू शकत नाही; तानाजी सावंतांचे राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, “राष्ट्रवादीची औलाद अशी आहे, ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं. या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी सांगितले होते. असं सांगणारा महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे. याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल,” असं सावंत म्हणाले.
५) नेपाळनेही चलनी नोटा छपाईचं कंत्राट चीनला दिलं; ₹142 कोटींचा मोठा सौदा
पाकिस्तान आणि बांगलादेशनंतर आता नेपाळनेही आपल्या चलनी नोटा छापण्याचे कंत्राट चीनला दिले आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) 1000 रुपयांच्या 43 कोटी नवीन नोटा छापण्याचे काम चीनच्या सरकारी कंपनी ‘चायना बँकनोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’ (CBPM) ला दिले आहे. या कंत्राटाची किंमत सुमारे ₹142 कोटी (16.98 दशलक्ष डॉलर) आहे. नेपाळकडे स्वतःची प्रगत नोट छपाईची यंत्रणा नसल्यामुळे, ते जागतिक निविदांद्वारे परदेशी कंपन्यांकडून नोटा छापून घेते. ऐतिहासिकदृष्ट्या ब्रिटन आणि भारताच्या कंपन्या हे काम करत होत्या, पण 2015 पासून चीनची CBPM कंपनी नेपाळच्या ₹5, ₹10, ₹100, ₹500 आणि आता ₹1000 च्या नोटा छापत आहे. सर्वात कमी किमतीची बोली लावल्याने त्यांची निवड झाली आहे.
६) मधुमेह, हृदय विकारसारखे आजार असल्यास अमेरिकेत नो एन्ट्री; डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने एकामागे एक आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी विविध देशावंर टॅरिफ लादणे, H-1B व्हिसाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. यात आता आणखी एका नव्या निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेत स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना आता मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग ह्रदय विकार या सारख्या दीर्घकालीन आजारांमुळे व्हिसा आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते. सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, मार्गदर्शक सूचना उच्चायूक्त कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून व्हिसा अधिकाऱ्यांनी व्हिसा अर्ज मंजूर करताना अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करावा, असंही सांगण्यात आलं आहे.
७) गुजरातमध्ये ३ दहशतवादी जेरबंद; देशभरात हल्ल्यांचा डाव होता तयार
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे आणि तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोन उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, तर एक हैदराबादचा आहे. हे तीन दहशतवादी शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते. ते देशभरात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते.
गुजरात एटीएस पथक गेल्या वर्षभरापासून या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होते. चौकशीदरम्यान, हे दहशतवादी आयसिसशी जोडलेले असल्याचे आणि देशात मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करत असल्याचे उघड झाले. सध्या या तिन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे आणि एटीएस या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेत आहे. मोहम्मद फैक, मोहम्मद फरदीन, सफिउल्लाह कुरेशी आणि झीशान अली अशी त्यांची नावे आहेत.
८) ‘धुरंधर’ चित्रपटातील अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर
अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ चित्रपटाचे नवीन पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात अभिनेता अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये अर्जुन लहान केस, लांब दाढी, काळा चष्मा, अंगठी असा लूकमध्ये दिसत आहे. ‘धुरंधर’ सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक शेअर करत रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये, “मौत का फरिश्ता… काउंटडाउन सुरू, फक्त ४ दिवस बाकी,” असे लिहिले आहे.
तसेच, चित्रपटाचा ट्रेलर १२ नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याचेही त्याने सांगितले. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. पाकिस्तानात राहून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या गुप्तहेराची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. धुरंधर सिनेमा ५ डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
९) सुनील शेट्टीची सून होणार मराठमोळी अभिनेत्री?; अहानच्या रंगल्या डेटिंगच्या चर्चा
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी’ मध्येही सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर तिनं मराठी सिनेमातही काम केलं आहे. अहान शेट्टीचं नाव ‘वेड’ सिनेमातील जिया शंकरसोबत जोडलं जातंय. त्यामुळे आता मराठी अभिनेत्री सुनील शेट्टीची सून होणार असल्याचं म्हटलं जातंय. जियाने आतपर्यंत अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. पण तो नेमका कोण? याबद्दल तिनं काहीच सांगितलेलं नाही. सध्या जियाचा बॉयफ्रेंड अहान शेट्टी असल्याची चर्चा रंगली आहे. पण अद्याप जिया व अहान दोघांनी याबद्दल काही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या फक्त चर्चा आहेत की त्यात सत्य आहे याबद्दल सांगता येणार नाही.
१०) हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेत भारताचा ‘सुपरफ्लॉप’ शो! पाकिस्तानने पटकावलं जेतेपद
हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला असून, संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. स्पर्धेत केवळ एक विजय मिळवत भारतीय संघाने सुपर फ्लॉप शो दाखवला, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने फायनल सामन्यात कुवेतचा एकतर्फी पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. विशेष म्हणजे भारताने एकमेव सामना पाकिस्तानविरुद्धच जिंकला होता.
The post शरद पवारांचा मोठा निर्णय ते तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, वाचा आजच्या टॉप १० बातम्या एका क्लीकवर… appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











