Deepesh Mhatre : राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते भाजपात पक्ष प्रवेश करणार आहेत.
ही राजकीय घडामोड ठाकरे आणि शिंदे या दोघांसाठी धक्का देणारी मानली जाते. दीपेश म्हात्रे यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यासंह भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर असा कोणता शब्द त्यांना दिला, ज्यामुळे त्यांनी ठाकरेंची साथ सोडली? याची चर्चा येथील स्थानिक राजकारणात रंगू लागली आहे. त्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून शिवसेनेने दीपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षात काम करण्यासाठी मर्यादित वाव आहे आणि मोकळीक नाही, असे सांगत त्यांनी म्हात्रे यांनी पक्ष सोडून जाण्याचे कारण सांगितले आहे. त्यांच्यासोबत तब्बल आठ नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यामुळे आगामी काळात कल्याण डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या घटनेमुळे आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
राज्यात स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राजकीय रणनिती ठरवली जात आहे. निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली जात आहे. अनेक बड्या नेत्यांना आश्वासन देऊन पक्षात सहभागी करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात या सर्व घडामोडी घडत आहेत. दीपक म्हात्रे यांना गळाला लावण्यात रवींद्र चव्हाण यांनी मोठी राजकीय चाल आखून डाव टाकला आहे. वर्षभरापूर्वी ठाकरेंकडे आलेल्या या नेत्याला भाजपने मोठी ऑफर दिल्यानेच पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीमुळे ते शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, तसे न होता त्यांनी आपल्या हाती कमळ घेतले आहे. दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे माजी महापौर होते. तसेच त्यांच्या आई नगरसेविका होत्या. ते राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या कुटुंबातून येतात.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर पद आणि आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपने एका राजकीय खेळीतून शिंदे आणि ठाकरेंना थेट इशारा दिला आहे.