राज्यात थंडीची लाट! महाबळेश्वर पेक्षाही जळगाव अधिक गारठले ; पारा १० अंशापर्यंत खाली

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यात मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगांव येथील थंडीचा पारा १० अंशापर्यंत खाली आल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडी चाहुल जाणवू लागली आहे. महाबळेश्वर पेक्षाही जळगाव अधिक गारठले, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ नोंदविले गेले. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत पारा आणखी खाली येण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भ हळूहळू गारठण्यास सुरवात झाली आहे.अवकाळी पाऊस गायब झाला आणि राज्यात थंडीची चाहुल लागली. चार दिवसांपूर्वी १८ ते २० अंशावर असलेले किमान तापमानात १२ ते १४ अंशापर्यंत खाली आले. तर, मध्य महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील पारा झपाट्याने खाली आला. शनिवारी (दि. ८) जळगांव जिल्ह्यात किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, त्यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा जळगांवकरांनी अनुभव घेतला.

नाशिक जिल्ह्यात १३.४, विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १३.३, बीडमध्ये १३.५ यासह बुलढाणा जिल्ह्यात १४, छत्रपती संभाजीनगरमध्ये १४.२, परभणी येथे १४.४, अहिल्यानगर येथे १४.६ तर पुणे जिल्ह्यात १५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. एकीकडे सकाळ आणि संध्याकाळी थंडीचा जोर वाढलेला असताना, काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे उन्हाचा चटकाही जाणवत होता.

३२ ते ३३ अंशावर असलेले कमाल तापमान आज सांताक्रुझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. तर कमाल तापामानात फारसा बदल होणार नसून, किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडीचा जोर आणखीन वाढणार असल्याचे दिसून येते.

The post राज्यात थंडीची लाट! महाबळेश्वर पेक्षाही जळगाव अधिक गारठले ; पारा १० अंशापर्यंत खाली appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!