
प्रभात वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे ( मयुर भुजबळ ) – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गण आगामी निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला गण ठरत आहे. या गणात एकूण सुमारे २६ हजार मतदार असून, त्यापैकी तब्बल १३ हजार मतदार केवळ तळेगाव ढमढेरे गावातील आहेत. म्हणजेच अर्ध्याहून अधिक मतदान तळेगावच्या हाती आहे. त्यामुळे या गणाचे भविष्य तळेगावच ठरवणार हे स्पष्ट झाले असले तरी, गावातील गटबाजीमुळे मतदान विभागले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणुका पुढे ढकलल्याने येथील राजकीय वातावरण तात्पुरते शांत झाले आहे.गटातील एकूण मतदानाच्या जवळपास ६०% म्हणजे तब्बल १५ हजारांहून अधिक मतदार एकट्या तळेगावातून आहे. पण या गावातून यंदा जिल्हा परिषदेसाठी एकही इच्छुक उमेदवार नसणे हे चिंतनास कारणीभूत ठरत आहे. गावातल्या गावात गटबाजीआणि खेकडा प्रवृत्तीमुळे हे इच्छुक उमेदवार नसण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
गावचे नेते व कार्यकर्ते पक्षनिष्ठा आणि गटबाजीमध्ये इतके गुंतले की, त्यांनी गावातील उमेदवारांना पाठबळ देण्याऐवजी गावाची एकजूट ढासळवली. यामुळे मतदारांमध्ये नाराजी असून, नेतृत्वावरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे बहुतांश इच्छुक पंचायत समितीकडे वळत आहेत.
गटागटातून हालचाली सुरू
पंचायत समिती सदस्यपदासाठी सध्या भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांत हालचाली जोरात सुरू आहेत. प्रत्येक पक्षाकडून ‘गावातून कोणाला पुढे करायचे? या प्रश्नावर पडद्यामागे चर्चा सुरू आहे. भाजपकडून माजी सदस्य इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट जुन्या चेहऱ्याला पुन्हा संधी देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना शिंदे गट तरुण चेहऱ्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
गटबाजी आणि अंतर्गत ताणतणाव
तळेगाव ढमढेरे हे राजकीयदृष्ट्या पुढारलेले गाव असले तरी, येथे गटबाजी आणि अंतर्गत मतभेद वाढलेले दिसतात. दोन-तीन स्थानिक गट आपापल्या नेत्यांच्या निष्ठेनुसार स्वतंत्र हालचाली करत आहेत. यामुळेच मतदान विभागले जाऊ शकते. गावात एकी रहाणे, निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा परिषद गटाचेही समीकरण गुंतागुंतीचे
जिल्हा परिषद गटात तळेगाव ढमढेरेसह इतर पाच-सहा गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषद जागेसाठी त्या गावांतूनही इच्छुक आहेत. त्यामुळे पंचायत समितीसाठी सर्वच पक्ष तळेगावातला उमेदवार अरावा की, बाहेरचा? या द्विधा मनःस्थितीत आहेत. जर तळेगाव ढमढेरेने एकमताने उमेदवार ठरवले, तर त्या उमेदवाराचा विजय जवळजवळ निश्चित आहे.
गावात राजकीय तापमान वाढले..
गावातील माजी सदस्य, माजी सरपंच, सोसायटीचे संचालक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. काही जण पक्षीय राजकारणापेक्षा ‘गावाच्या हिताचा’ विचार करून एकत्र येण्याची चाचपणी करत आहेत, तर काही नेते आपले वर्चस्व टिकवण्यासाठी स्वबळावर उमेदवारीसाठी तयारी करत आहेत.
तळेगाव ठरवणार ‘गणाचा राजा’
राजकीय जाणकारांनुसार, या गणातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तळेगावचे मतदान. हे मतदान जर एखाद्या उमेदवाराच्या बाजूने एकत्र आले, तर तो निकालाला हवे तेवढे वळण देऊ शकतो.
The post तळेगाव ठरवणार ‘गणाचा राजा’, पण अंतर्गत गटबाजीमुळे एकीला सुरुंग; मतांच्या विभाजनाचा धोका appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











