Pimpri : आज होणार आरक्षणाचा फैसला; इच्छुकांची धाकधूक वाढली

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी १२८ जागा असून त्‍यापैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव आहेत. कोणत्या प्रभागात महिलांचे आरक्षण पडणार याबाबत आज (दि. ११) फैसला होणार आहे.

महिलांच्या जागा या खुल्या गटातील जांगाच्या बरोबरीने आहेत. कुटुंबात पर्यायी योग्य महिला उमेदवार नसल्याने काहीजणांना निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागणार आहे. परिणामी अनेकांच्या राजकीय कार्यकीर्दीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीला आता चांगलाच रंग चढू लागला आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रभागातील चित्र स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडतीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली असून आज प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये सोडत होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या एकूण १२८ जागांपैकी ६४ जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

अनुसूचित जमाती (एसटी) च्या तीनपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. मात्र, अनुसूचित जाती (एससी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि खुल्या गटात (ओपन) महिलांसाठी अर्ध्या जागा राखीव आहेत. या जागांवर इतर पुरुष उमेदवारांना उभे राहता येत नाही. तसेच ३२ प्रभागातील चार जागांपैकी २ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे.

सन २०१७ नंतर तब्बल नऊ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी २०२० पासून अनेकांनी तयारी केली आहे. आपल्या प्रभागात अनेक कार्यक्रम घेत तसेच मतदारांशी संपर्क ठेवत नगरसेवक होण्याचे स्वप्न अनेकांनी बघितले आहे. मात्र, आरक्षण सोडतीनंतर या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

ज्या प्रभागातून तयारी केली त्या प्रभागात महिला आरक्षण पडले तर पुरुष इच्छुकांची निवडणूक लढविण्याची संधी जाणार आहे. दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविण्याचा विचार केला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मतदारांपर्यंत कमी कालावधीत पोहचणे शक्य नाही. कमी कालावधीत प्रचार यंत्रणा राबवणे कठीण असणार आहे. त्यातच दुसऱ्‍या प्रभागात जिंकून येण्याची शक्यता कमी असल्याने पक्ष देखील तिकीट देताना विचार करणार.

अशावेळी पुरुष इच्छुकांना घरी बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर इतके वर्ष निवडणूक लढविण्यासाठी मतदारांवर केलेला खर्च देखील वाया जाणार आहे. उलट पक्षाच्या आदेशानुसार भलत्याच उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रभागातील आपल्या जागेवर महिलांचे आरक्षण पडू नये यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहे.

तर महापालिकेत महिलाराज

तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने शहरातील युवती, महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शहरात अनेक ज्येष्ठ माजी नगरसेविका आहेत. त्यांनी त्यांच्या जागांवर दावा कायम ठेवला आहे. तर विविध पक्षाच्या विविध आघाड्यांवर महिला पदाधिकारी म्हणून आहेत. त्यांनाही निवडणूक लढवून महापालिकेच्या सभागृहात जायचे आहे. त्यामुळे निवडणूकीच्या रिंगणात महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय असणार आहे.

तर अनुसुचित जाती, जमाती, मागास प्रवर्ग आणि खुल्या गटातील खुल्या जागांवर महिलांना निवडणूक लढविण्याबाबत कोणतेही बंधन नाही. म्हणजेच ओपन गटातील खुल्या जागेवर देखील त्या वर्गातील महिला निवडणूक लढवू शकतात. त्या जागांवर महिला निवडून आल्या तर नगरसेवकांपेक्षा नगसेविकांची संख्या सभागृहात वाढणार आहे. त्यामधून महापालिकेवर महिलाराज येईल.

‘महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने आरक्षण सोडतीची संपूर्ण तयारी झाली आहे. मंगळवारी सकाळी ही सोडत पार पडणार आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि ओपन गटात ६४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्या जागेवर त्या वर्गातील महिलाच उभ्या राहू शकतात. मात्र, त्या-त्या वर्गातील महिला अराखीव जागांवर देखील उभ्या राहू शकतात.’ -सचिन पवार, उपायुक्त. निवडणूक विभाग.

 

The post Pimpri : आज होणार आरक्षणाचा फैसला; इच्छुकांची धाकधूक वाढली appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!