Nevase Politics : नगरपंचायत निवडणुकीचा ज्वर ; इच्छुकांचे गुडघ्याला बांशिंग…तर नेत्यांचे श्रद्धा और सबुरीचे संकेत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
नेवासे – नेवासे शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात अनेक इच्छुक उमेदवारांनी आता आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी त्यांना सध्या माणुसकीचा पाझर फुटलेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील गल्लीबोळातील अनेक हॉटेलातही सध्या ‘चाय पे’ चर्चा रंगताना दिसून येत आहे. नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार हे सध्या पडद्याआडून आपले राजकीय जुगाड बसविण्यात दंग झालेले आहे. त्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांची राजकीय आखाड्यात टिमकी वाजविताना दिसून येत आहे.

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे विश्वासू नेतेमंडळी आता मतदारांचा कानोसा घेऊन जनमत मागे असलेल्या उमेदवारांची पडताळणी करून चाचपणी करताना राजकीय फडात मग्न झाले आहे. नेवासे नगरपंचायत निवडणुकीसाठी १७ प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झालेली असली तरी जनाधार असलेल्या उमेदवारांच्या संपर्कात राजकीय नेते मंडळी आहे.

निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात असली तरी इच्छुक मात्र गडाखांच्या आगामी राजकीय भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत.मतदारांची चाचपणी आणि उमेदवारांचा जनाधार ओळखण्यासाठी नेवासे शहरात स्वतंत्र यंत्रणा सध्या मतदारांचा व्होरा ओळखण्यात मग्न झालेली दिसून येत आहे. जनाधार असलेल्या मात्तबर नेतेमंडळीना नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राजकीय फडात उतरविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून जोर दिला जात आहे.

बंडोबांना थंडोबा करण्यासाठी नेतेमंडळी सध्या साईबाबांच्या श्रद्धा और सबुरीचा मंत्र जपत मनधरणी करून थांबा आणि पहाच्या भूमिकेत असल्यामुळे इच्छुक मंडळी सध्या शांत बसून राजकीय आखाड्यातील खेळ निमूटपणे पाहताना दिसून येत आहे. राज्याचे माजी मंत्री आणि दिग्गज नेते शंकरराव गडाख यांच्या राजकीय भूमिकडे अनेकांचे डोळे लागलेले असून, त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट झाल्यावरच नेवासे शहरातील राजकीय रणांगणाला मोठा ‘ताव’ येणार असल्याचे जाणकारांतून बोलले जात आहे.

The post Nevase Politics : नगरपंचायत निवडणुकीचा ज्वर ; इच्छुकांचे गुडघ्याला बांशिंग…तर नेत्यांचे श्रद्धा और सबुरीचे संकेत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!