
प्रभात वॉच/संजय कडू
पुणे – पुणे- बंगलोर महामार्गावरील नवले पुलाची ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून वाढती ओळख अजूनही कायम आहे. मागील दहा वर्षांपासून या भागात घडणारे वारंवारचे अपघात, मृतांची वाढती संख्या आणि अयशस्वी ठरलेल्या उपाययोजनांमुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येवर व्यवहार्य तांत्रिक, नियामक आणि सामाजिक उपाय एकत्रितपणे राबविले, तरच परिस्थिती बदलू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अपघातांची भीषण पार्श्वभूमी
नवले पूल परिसरात गेल्या दशकात शेकडो अपघात झाले असून, यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो जखमी झाले आहेत. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या भीषण अपघातात ब्रेक फेल ट्रकने ४० पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. त्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. या भागात कात्रज बोगद्यावरून दरी पुलाकडे उतरताना तीव्र उतार आहे. येथे जड वाहनचालक इंजिन बंद करून इंधन वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वारंवार ब्रेक फेल होतात. त्यातच रस्त्याची रचना, दुचाकी व रिक्षांचा प्रवेश, सेवारस्त्यावरून थेट महामार्गावर येणारी वाहने, तसेच बेजबाबदार वेगामुळे ही परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे.
निष्फळ ठरलेल्या उपाययोजना
याठिकाणी आधीच स्पीड गन, रंबलर्स, सूचना फलक, जनजागृती मोहिमा आणि बोगद्याच्या पुढे पोलीस चौकी अशी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, आजही अपघातांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. नागरिक आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणासह, तांत्रिक सुधारणा न झाल्याने हे सर्व उपाय अपुरे ठरत आहेत. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, नवले पुलावरचा उतार हे मुख्य आव्हान आहे. येथे ट्रक स्पीड किलर लेन, इमर्जन्सी सँड बे सारख्या तांत्रिक उपाययोजना गरजेच्या आहेत. याशिवाय सर्व्हिस रोडवर अडथळे घालून स्थानिक वाहतुकीसाठी वेगळी व्यवस्था करावी.
नागरिकांची मागणी
स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संस्थांनी महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिकेकडे एकत्रित कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. प्रशासन, वाहतूक पोलीस, लोकसेवक आणि नागरिकांनी संयुक्त कृती केली नाही, तर हा ब्लॅक स्पॉट लवकरच डेथ झोन बनेल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वाहनचालकांची जबाबदारी
तज्ज्ञांच्या मते केवळ प्रशासनावर दोष टाकून उपयोग नाही. वाहनचालकांनीही स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगमर्यादा पाळावी, ब्रेक आणि टायरची नियमित तपासणी करावी आणि इंजिन बंद करून उतारावर वाहन चालवण्याचा प्रयत्न टाळावा.
मागील काही वर्षांतील प्रमुख अपघांत..
-२१ ऑक्टोबर २०२१ : कंटेनरने पीएमपीएमएल बसला धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी.
-२१ नोव्हेंबर २०२२ : सुसाट ट्रेलरने ४७ वाहनांचे नुकसान; अनेक जखमी.
-१० फेब्रुवारी २०२४ : भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक; अनेक गंभीर जखमी.
-२३ फेब्रुवारी २०२४ : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने सात ते आठ वाहनांना धडक.
-३ मे २०२५ : सलग तीन अपघातांत तिघांचा बळी.
-२५ जानेवारी २०२५ : कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू.
The post Navale bridge : नवले पुलाचा ‘ब्लॅक स्पॉट’ होतोय ‘डेथ झोन ’! अपघातांची १० वर्षे आणि निष्फळ ठरलेल्या उपाययोजना appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











