Muralidhar Mohol : पुस्तकांवरील जीएसटी कमी करा – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन

Muralidhar Mohol
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुस्तक आणि कागदावर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर कमी करण्याची मागणी प्रकाशन आणि शैक्षणिक क्षेत्राकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार, तसेच केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत औपचारिक पत्र पाठविले आहे.मोहोळ यांनी दिलेल्या पत्रानुसार, कागद आणि संबंधित साहित्यावरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे पुस्तकांच्या किमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

या वाढीचा परिणाम थेट विद्यार्थी, पालक, लेखक, तसेच लघु व मध्यम प्रकाशन उद्योगांवर होत आहे. कोविडनंतर अजूनही सावरण्याच्या टप्प्यात असलेला प्रकाशन व्यवसाय या वाढलेल्या करामुळे पुन्हा संकटात सापडू शकतो, त्यामुळे जीएसटी वाढीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे, की पुस्तके ही केवळ वस्तू नसून ती ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचा पाया आहेत.

अशा परिस्थितीत पुस्तकांवरील जीएसटी दर पुन्हा १२ टक्क्यांवर आणावेत किंवा शैक्षणिक वापरासाठी असलेल्या कागद व पुस्तकांना करातून पूर्णतः सूट द्यावी. जीएसटी दर कमी केल्यास प्रकाशन व मुद्रण उद्योगाला पुनरुज्जीवन मिळेल, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य सर्वांसाठी परवडणारे राहतील आणि विकसित भारत या ज्ञानाधिष्ठित ध्येयाला चालना मिळेल, असेही मोहोळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

The post Muralidhar Mohol : पुस्तकांवरील जीएसटी कमी करा – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अर्थमंत्री सीतारामन यांना निवेदन appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!