Manikrao Kokate : …तर अजित पवार राजीनामा देतील, कोकाटे यांचे मोठं वक्तव्य

Manikrao Kokate & Ajit Pawar
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुणे जिल्ह्यातील १८०० कोटी रुपयांच्या भूमी घोटाळ्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना “मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे” असे म्हटले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी पक्षप्रमुखांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. कोकाटे यांनी सांगितले की, “अजित पवार हे कधीच चुकीचे काम करणार नाहीत. आरोप सिद्ध झाल्यास ते राजीनामा देतील.”

अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न; कोकाटे यांचा विश्वास
माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की, अजित पवार यांना बदनाम करण्याचा राजकीय डाव सुरू आहे आणि हे आता थांबले पाहिजे. “संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांना ओळखतो. त्यांचा स्वभाव कसा आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. ते कधीच काही चुकीचे काम करणार नाहीत. उगाचच माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले आहे. विरोधी पक्षांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, पण अशा प्रकारचे काम दादा करू शकत नाहीत. हा माझा आत्मविश्वास नाही, तर सर्व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे,” असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. या घोटाळ्यातील भूमी खरेदी रद्द झाली असूनही, चौकशी सुरू असल्याने राजकीय वाद तीव्र झाला आहे.

एकनाथ खडसे यांचा टोला; कोकाटेंचे खणखणीत उत्तर
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी यावर टोला लगावला असून, “जेव्हा माझ्यावर आरोप झाले, तेव्हा मी राजीनामा दिला होता. मग अजित पवार राजीनामा का देत नाहीत?” असे विचारले. यावर कोकाटे यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “नुसते आरोप करणे पुरेसे नाही, ते सिद्धही झाले पाहिजेत. आम्ही जाहीरपणे सांगतो की, जी काही चौकशी आहे, ती पारदर्शकपणे होवो. आम्ही तिचा स्वीकार करू आणि सामोरे जाऊ. दोषी आढळल्यास अजित पवार राजीनामा देतील.” या विधानाने पक्षातील एकजूट दाखवत कोकाटे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीबाबत कोकाटे यांनी सांगितले की, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. “युती करायची की नाही, हे तेथील स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आहे. स्थानिक नेते आणि आमदारांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. काही ठिकाणी एकमत झाल्यास युती होऊ शकते, तर काही ठिकाणी स्वबळावर लढावे लागेल. सध्या चाचपणी आणि आढावा सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरविण्यासाठी पक्षांत चर्चा जोरदार सुरू आहेत.

The post Manikrao Kokate : …तर अजित पवार राजीनामा देतील, कोकाटे यांचे मोठं वक्तव्य appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!