
प्रभात वृत्तसेवा
आळंदी ( ज्ञानेश्वर फड ) –
चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू॥1॥ होतील संतांचिया भेटी। सांगू सुखाचीया गोष्टी ॥2॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर। मुखी म्हणता चुकती फेर॥3॥ जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक॥4॥
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेची जय्यत तयारी आळंदीत सुरु आहे. यावर्षी मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाने ही तयारी सुरु केली असून इंद्रायणीच्या पलीकडे भव्य तात्पुरता दर्शनमंडप उभारणी सुरु आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी, प्रमुख चौकांमध्ये वॉच टॉवर उभारण्यात आलेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. तसेच व्यापार्यांचीही लगबग सर्व रस्त्यांवर दिसून येत आहे.
या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. 15 नोव्हेंबरला एकादशी तर 17ला समाधी सोहळा हे दोन प्रमुख उत्सव साजरे होणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक येत असतात. संत नामदेव महाराज यांच्या अभंगाप्रमाणे माऊलींनी ज्यावेळी समाधी घेतली तेंव्हा अनेक साधू, संत, देव-देवता आणि पंढरपूरचा श्री पांडुरंग हे उपस्थित होते. त्यानुसार परंपरेप्रमाणे दरवर्षी माऊलींच्या या समाधी सोहळ्यासाठी येणारी पांडुरंगरायांची पालखी कार्तिक वद्य अष्टमी अर्थात बुधवारी 12 नोव्हेंबरला आळंदीत पोहोचणार आहे.
या सोहळ्यानिमित्त आता ठिकठिकणी हरिनाम सप्ताह सुरु होत असून पुढील आठवडाभर सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकायला मिळणार आहे.मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम देवस्थानकडून जाहीर करण्यात आले आहेत. ही कार्तिकी यात्रा 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत असणार असून, यामध्ये भजन, कीर्तन आणि जागरणाचे अधिकृत कार्यक्रम समाविष्ट आहेत.15 नोव्हेंबर कार्तिकी एकादशी हा या सोहळ्यातील प्रमुख दिवस असतो. यादिवशी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने आलेले असतात.
कार्तिकी वारीसाठी आळंदीत जय्यत तयारी सुरु आहे.
यादिवशी रात्री 12. 30 ते पहाटे 2 वाजेपर्यंत माऊलींच्या समाधीवर 11 ब्रम्हवृंदांच्या जयघोषात पवमान अभिषेक व दुधारती होईल. याच पुजेला दर्शनबारीतील पहिले वारकरी जोडपे यांना पुजेचा मान दिला जातो. त्यानंतर दुपारी 1 वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा होईल. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविक मोठी गर्दी करत असतात. कारण ज्यांना दर्शनबारीला थांबून दर्शन घेता येत नाही ते येथे माऊलींचे दर्शन घेऊ शकतात.
तर 16 नोव्हेंबरला पहाटे साडेतीन ते चार यावेळेत खेडचे प्रांत यांच्याहस्ते पंचोपचार पुजा होईल. आणि दुपारी 4 ते 7 वेळेत श्रींचा रथोत्सव होईल. तर 17 नोव्हेंबरला 9 ते 12 यावेळेत नामदास महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन दुपारी 12 वाजता माऊलींच्या समाधी दिनानिमित्ताने घंटानाद, पुष्पवृष्टी व आरती होणार आहे.
“यावर्षी दरवर्षीपेक्षा मोठ्या संख्येने वारकरी भाविक येण्याची शक्यता आहे. दशमी, एकादशी, द्वादशी दिवशी श्रींचे नित्योपचार वगळता 24 तास दर्शन सुरू राहील. देवस्थान कमिटीकडून दर्शनबारीत वारकर्यांना 24 तास चहा, दूध, फराळ, भोजन, पाणीवाटप केले जाईल. सर्व स्तरावरील प्रशासकीय अधिकार्यांसोबत नियोजन बैठका झाल्या असून वारकर्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन सुरु आहे. यंदा वारीदरम्यानच निवडणुका असल्याने सरकारी यंत्रणांचे या सोहळ्याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा आहे.”
-योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी
The post Kartiki Wari :पांडुरंगराय येणार माऊलींच्या भेटीला! कार्तिकी वारीसाठी आळंदीत जय्यत तयारी, सोहळ्यासाठी लाखो भाविक जमणार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











