‘हा स्फोट I-20 कारमध्ये झाला, प्रत्येक अँगलची चौकशी केली जाईल’, दिल्ली स्फोटावर गृहमंत्री अमित शहा यांचे विधान

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी एका भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ, सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका हुंदाई I-20 कार मध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्रत्येक संभाव्य बाजूने स्फोटाच्या कारणांचा कसून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आज संध्याकाळी अंदाजे ७ वाजता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका हुंदाई I20 कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे काही पादचारी जखमी झाले असून, जवळची काही वाहनेही खराब झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.”

“या स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच १० मिनिटांच्या आत दिल्ली क्राईम ब्रँच आणि दिल्ली स्पेशल ब्रँचची पथके घटनास्थळी पोहोचली. या स्फोटाची प्रत्येक बाजूने सखोल तपासणी केली जाईल. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” गृहमंत्र्यांनी लवकरच घटनास्थळी आणि जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात भेट देणार असल्याचेही स्पष्ट केले.

तपास यंत्रणा सज्ज: दिल्ली पोलिसांच्या टीम्ससह राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, त्यांनी सखोल तपास सुरू केला आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून तपासणी सुरू आहे. कोणत्या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केले याचा तपास केला जात आहे.

The post ‘हा स्फोट I-20 कारमध्ये झाला, प्रत्येक अँगलची चौकशी केली जाईल’, दिल्ली स्फोटावर गृहमंत्री अमित शहा यांचे विधान appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!