Ganesh Naik : गणेश नाईकांचा जनता दरबार आता भाईंदरमध्ये भरणार

Ganesh Naik
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

भाईंदर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्शवभूमीवर, जवळपास 11 वर्षांपासून मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या राजकारणापासून दूर राहिलेले भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. यामुळे भाजपच्या संघटनेला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

महानगरपालिकांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या व नागरिकांशी थेट संपर्क साधण्याच्या दृष्टीकोनातून भाजपने विशेष रणनिती आखली असल्याचे दिसून आले आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत गणेश नाईक जनता दरबार आयोजित करत आहेत. या दरबारात नागरिकांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यासाठी अधिकारी देखील उपस्थित असतात.

काही दिवसांपूर्वी गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये देखील जनता दरबाराचे आयोजन करताना, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आव्हान उभे केले होते. त्यामुळे नाईक एकदम चर्चेत आले होते. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा गणेश नाईक मीरा- भाईंदरच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. त्यांनी 15 नोव्हेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन केले असून यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने येवून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन भाजपकडून करण्यात येत आहे.

नाईकांच्या जनता दरबारामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये असलेला अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबई व ठाण्यामध्ये भाजप व शिवसेना हा वाद आधिपासून अस्तित्वात आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात दोन विधानसभा मतदार संघ असून भाजप व सेनेचा प्रत्येकी १ आमदार आहे.

गेल्या काही काळामध्ये भाजपमधील नाराजांना सोबत घेवून शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याचा परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. याबरोबरीने सरनाईकांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर करताना शहरामध्ये वर्चस्व निर्माण करत असल्यने भाजप अडचणीत आल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे सरनाईकांचे असलेल्या वर्चस्वाला रोखण्याच्या उद्देश्याने भाजपने मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात गणेश नाईकांना इंट्री दिली असल्याचे स्पष्ट होत आहे.

नाईकांच्या प्रभावाचा भाजपला फायदा
2014 पूर्वी राष्ट्रवादीत असताना, गणेश नाईक यांनी ठाणे व मीरा भाईंदरमध्ये प्रचंड प्रभाव निर्माण केला होता. ठाण्याचे पालकमंत्रीपद व संजीव नाईक यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी समर्थकांनी मोठी फळी उभारली होती. मात्र 2014 नंतर बदललेल्या परिस्थितीमुळे शहराशी असलेला त्यांचा संपर्क कमी झाला होता. आजही नाईक शहरामध्ये आपली ताकद राखून ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या शहरातील पुनरागमनामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता जास्त असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.

The post Ganesh Naik : गणेश नाईकांचा जनता दरबार आता भाईंदरमध्ये भरणार appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!