Delhi Explosion : दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरचा समावेश; पाकिस्तानसोबतचे कनेक्शन आले समोर

Delhi Explosion
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या नावाखाली दहशतवादी कारवायांचे भयानक षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि जम्मू-कश्मीरसह अनेक राज्यांमध्ये तपास यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून उच्चशिक्षित डॉक्टरांसह एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसार गजवत-उल-हिंद (AGUH) या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांशी जोडलेल्या या ‘व्हाईट-कॉलर टेरर इकोसिस्टम’मध्ये एकूण सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. फरीदाबादमधील अल-फलाह युनिव्हर्सिटीला दहशतवादी केंद्र म्हणून संशयित ठरवले गेले असून, दिल्ली-एनसीआरमध्ये IED स्फोटकांसह मोठी घातपाती कारवाई घडवण्याची तयारी असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.

लेडी डॉक्टरची खतरनाक भूमिका; कारमध्ये AK-47 सापडली
या कारवाईतील सर्वात धक्कादायक खुलासा फरीदाबाद आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमधून समोर आला. अल-फलाह युनिव्हर्सिटीत शिकवणारे डॉ. मुजम्मिल शकील (३५ वर्षे, पुलवामा, जम्मू-कश्मीर) याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून त्याची गर्लफ्रेंड मानली जाणारी डॉ. शाहीन शाहिद (मूळ लखनऊची) याला फरीदाबादमधून ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, डॉ. शाहीनच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये AK-47 सारखी क्रिंकोव असॉल्ट रायफल, तीन मॅगझिन्ससह ८३ राऊंड्स, एक पिस्तूलसह आठ बुलेट्स आणि दोन मॅगझिन्स जप्त करण्यात आल्या. ही कार मुजम्मिल शकीलच वापरत असल्याचे समोर आले आहे.

डॉ. शाहीनवर पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी थेट संपर्क असल्याचा गंभीर आरोप आहे. तिच्यावर JeM आणि AGUH सारख्या खतरनाक संघटनांशी जोडले गेल्याचा संशय आहे. तपासात असे उघड झाले की, “डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींवर संशय येणार नाही, म्हणून हा मॉड्यूल निवडला गेला.” डॉ. शाहीन अल-फलाह युनिव्हर्सिटीत आरोग्य सेवा किंवा प्रोजेक्टच्या निमित्ताने सक्रिय होती. या प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांचा समावेश आहे. डॉ. अदील अहमद राथर (सहारनपूरमधून अटक, JeM समर्थक पोस्टर्स लावण्याच्या गुन्ह्यात) आणि डॉ. अहमद मोहिउद्दीन सईद (गुजरातमधून अटक).

अल-फलाह युनिव्हर्सिटी ‘टेरर हब’ ठरली
या दहशतवादी मॉड्यूलचे धागे फरीदाबादमधील अल-फलाह युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचले आहेत. डॉ. मुजम्मिल शकील याच विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये तीन वर्षांपासून शिकवत होता आणि कॅम्पसमध्ये राहत होता. मात्र, तो दोन घरे भाड्याने घेत असल्याचे समोर आले. एक साठ्याच्या उद्देशाने. तपास यंत्रणा आता लखनऊ, अलीगढ, दिल्ली, जम्मू-कश्मीर आणि गुजरातमधील रॅडिकलायझ्ड प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा मागोवा घेत आहेत. परदेशी हँडलर्ससोबत संपर्क असल्याचे संशयितांच्या मोबाईल डेटावरून उघड झाले आहे. आगामी काळात आणखी अटका होण्याची शक्यता आहे.

दोन ठिकाणी स्फोटकांचा महाकाय साठा; IED बनवण्याची तयारी
या मॉड्यूलद्वारे दिल्ली-एनसीआरमध्ये शेकडो शक्तिशाली IED स्फोटकांसह मोठी दहशत निर्माण करण्याची तयारी सुरू होती. डॉ. मुजम्मिलच्या चौकशीतून धौज गावातील त्याच्या भाड्याच्या रूमपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर एका घरातून ३६० किलो अमोनियम नायट्रेट (स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे केमिकल) जप्त करण्यात आले. हा साठा फक्त १५ दिवसांपूर्वी पोहोचला होता आणि आठ मोठ्या व चार छोट्या सूटकेसमध्ये लपवून ठेवला होता. रूममधून वॉकी-टॉकी, २० टाइमर, २० बॅटरी, घड्याळे, क्रिंकोव असॉल्ट रायफल, पिस्तूल व मॅगझिन्ससह इलेक्ट्रिक वायरिंग आणि ५ किलो हेवी मेटलचा साठाही मिळाला.

आजच्या कारवाईत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला. मुजम्मिलच्या माहितीवरून फतेहपूर तगा गावातील एका घरातून तब्बल २,५६३ किलो संशयास्पद अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. हे घर हाफिज इश्तियाक (मौलाना, धौज गावातील मशीदेचे इमाम) चे आहे, जो मुजम्मिलचा नियमित संपर्कात होता. मौलानावर झाकिर मूसा (२०१९ मध्ये ठार झालेला दहशतवादी) शी जोड असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, कसून चौकशी सुरू आहे. एकूण २,९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त झाल्याने, दिल्लीत मोठ्या विनाशाची शक्यता टाळली गेली.

संयुक्त कारवाई आणि पुढील तपास
जम्मू-कश्मीर पोलिस, हरियाणा पोलिस आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही कारवाई पार पडली. फरीदाबादचे पोलिस आयुक्त सतेंदर कुमार गुप्ता यांनी सांगितले की, “हे अमोनियम नायट्रेट आहे, RDX नाही. फॉरेंसिक तपासानंतर अधिक तपसाळ माहिती समोर येईल.” संशयितांवर श्रीनगरमध्ये JeM समर्थक पोस्टर्स लावण्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, देशव्यापी अलर्ट जारी केला आहे. हे प्रकरण दहशतवादाच्या नव्या रूपावर प्रकाश टाकते, ज्यात शिक्षित वर्गाचा वापर होत आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आणखी काही संशयितांना लवकरच अटक होईल.

The post Delhi Explosion : दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरचा समावेश; पाकिस्तानसोबतचे कनेक्शन आले समोर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!