Dehu News : देहू नगरपंचायतीचा अजब कारभार! फ्लेक्सवर १२ लाखांचा खर्च, पण अवैध फ्लेक्सवर कारवाई नाहीच

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
देहूगाव –
देहू नगरपंचायतीकडून यात्राकाळात लावण्यात येणारे दिशादर्शक फलक, माहितीपत्रक, विविध कार्यक्रमांसाठीचे फ्लेक्स तसेच कार्यालयीन आवश्यकतेसाठीचे फलक यावर तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या मोठ्या खर्चाच्या तुलनेत फ्लेक्समधून नगरपंचायतीला होणारे उत्पन्न अत्यंत तोकडे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.देहू नगरपंचायत प्रशासनाकडून फ्लेक्स लावण्याचे काम आरंभ इंटरप्राईजेस या संस्थेला देण्यात आले आहे.

बोर्डसह फ्लेक्स रु. ६० प्रति स्क्वेअर फूट, निव्वळ फ्लेक्स रु. ३७ प्रति स्क्वेअर फूट आणि डिझाईन चार्ज रु. २२० असे दर आकारले जातात. यानुसार वर्षभरात रु. ५ लाख ३६ हजार ७५३, रु. ४ लाख ८६ हजार ५४७ आणि रु. १ लाख ८१ हजार २६६ अशी तीन बिले जमा करण्यात आली आहेत. एकूण १२ लाख ४ हजार ५६६ रुपयांची रक्कम आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अदा करण्यात आली असून नवीन वर्षाचे बिल अद्याप देण्यात आलली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

फ्लेक्स खर्च प्रचंड, उत्पन्न मात्र नगण्य
देहूतील प्रत्येक चौकात, मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच यात्रास्थळी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जातात. नगरपंचायतीच्या नियमांनुसार परवानगी घेऊन फ्लेक्स लावण्यासाठी दोन रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रति दिवस असा दर आकारला जातो. मात्र फ्लेक्स लावणाऱ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नाबाबतची माहिती प्रशासन देण्यास विलंब करीत असल्याने नगरपंचायतीला मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या मते, बाजारात फ्लेक्सचे वास्तविक दर कमी असताना नगरपंचायतीकडून ठेकेदाराला देण्यात येणारा दर जास्त आहे, त्यामुळे करदात्यांचे पैसे वाया जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फ्लेक्समुळे वाढले शहराचे विद्रूपीकरण
नगरपंचायतीने फ्लेक्स लावण्यासाठी ठराविक जागा निश्चित केल्या आहेत. तरीही विनापरवाना मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जात असून विद्रूपीकरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. फ्लेक्स खर्चातील अनियमिततेवर प्रशासनाने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

The post Dehu News : देहू नगरपंचायतीचा अजब कारभार! फ्लेक्सवर १२ लाखांचा खर्च, पण अवैध फ्लेक्सवर कारवाई नाहीच appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!