Daund Politics : दौंडमध्ये पुन्हा रंगू लागले पक्ष प्रवेशाचे सोहळे; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष सक्रिय

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पारगाव –
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची तारीख या न्यायालयाच्या निकालानंतर केव्हा ही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या मुळे या मिनी विधानसभेच्या तोंडावर दौंड तालुक्यात पुन्हा पक्ष प्रवेशाचे सोहळे तालुक्यात रंगू लागले आहेत.केडगाव येथील मयुरेश्वर हॉस्पिटलचे डॉ. भरत खळदकर यांनी शुक्रवारी (दि.१४) आमदार अॅड. राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

डॉ. भरत खळदकर हे नुकत्याच झालेल्या विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवार होते.मागील महिन्यात नानगांव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या नीता खळदकर यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी भाजपचे दौंड शहराचे अध्यक्ष स्वप्निल शहा व नंदू पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधान सभेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा दौंड तालुक्यात अनेक पक्ष प्रवेश झाले होते. त्यातील माजी आमदार रमेश थोरात व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात झालेला पक्ष प्रवेश हा दखलपात्र पक्ष प्रवेश होता. यांच्या या प्रवेशामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पारडे जड झाले होते. त्यामुळे विधान सभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली आपणास पाहवयास मिळाली.

परंतु रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ऐन वेळेस सोडचिट्टी देऊन तीन महिन्यापूर्वी पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची दौंड तालुक्याची सूत्रे हातात घेतली आहेत.भाजपचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी सुद्धा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार उभे करण्याच्या चाचपणी सुरू असून पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे.

अप्पासाहेब पवार व प्रमुख पदाधिकारी हे त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक गावच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आहेत. तालुक्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार असून आघाडीतील सर्व घटक पक्षांसमवेत या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे अप्पासाहेब पवार यांनी सांगितले. दौंड तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता असून तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व भारतीय जनता पक्ष या मुख्य तीन पक्षात लढत होऊ शकते.

अजूनही पक्षप्रवेश होणार…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यामध्ये अनेक पक्ष प्रवेश सोहळे पहावयास मिळाले होते. आता मिनी विधानसभा म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ही तालुक्यामध्ये काही दखलपात्र पक्ष प्रवेश सोहळे झाले आहेत व असेच आजून काही प्रवेश सोहळे होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एक उच्च पदस्थ पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार असल्याची कुजबुज ऐकवयास मिळत आहे.

The post Daund Politics : दौंडमध्ये पुन्हा रंगू लागले पक्ष प्रवेशाचे सोहळे; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष सक्रिय appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!