CET Cell : सीईटी सेलचा मोठा निर्णय! प्रवेशाच्या तक्रारींवर आता फक्त १५ दिवसांत निर्णय, विशेष समितीची स्थापना

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील महाविद्यालयांमध्ये विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारींवर आता विद्यार्थ्यांना तातडीने दिलासा मिळणार आहे. राज्य सीईटी सेलने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एका विशेष उपसमितीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांच्या आत त्यावर निर्णय दिला जाणार आहे.

सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी याबद्दल माहिती दिली. दरवर्षी सीईटी सेलमार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आणि त्यानंतरची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेदरम्यान अनेक टप्प्यांवर विद्यार्थी, पालक आणि इतर संबंधित घटकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी येतात. त्या वेळेत सुटाव्यात, यासाठी २०१५ च्या प्रवेश व शुल्क नियमन कायद्यातील तरतुदींनुसार ही नवी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

यापूर्वी तक्रारींवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायचे. मात्र, आता या नवीन समितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याने किंवा पालकाने प्रवेशासंदर्भात तक्रार दाखल केल्यास, ती समितीसमोर ठेवली जाईल. समितीला १५ दिवसांच्या आत किंवा प्रवेशाची अंतिम तारीख उलटून जाण्यापूर्वी त्या तक्रारीवर निर्णय देणे बंधनकारक असणार आहे.

चार सदस्‍यीय तक्रार निवारण समिती नेमण्यात आली असून, त्‍याचे अध्यक्ष प्रवेश नियामक प्राधिकरणचे अपर सचिव हे आहेत. या समितीने ऑक्टोबर २०२५ च्या नियमावलीनुसार निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून तक्रारींचे निवारण करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

The post CET Cell : सीईटी सेलचा मोठा निर्णय! प्रवेशाच्या तक्रारींवर आता फक्त १५ दिवसांत निर्णय, विशेष समितीची स्थापना appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!