Bhor Election : नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच! भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस, पण उमेदवार यादी मात्र गुलदस्त्यात

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
भोर – भोर शहरात नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व प्रभागांमधून अजून कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी यादी जाहीर झाली नाही. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून चार दिवसात फक्त २ उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्या राजकीय पक्षाचे तिकीट कुणाला मिळणार ? हे अजून गुलदस्त्यात असल्याने इच्छुक उमेदवारांना वेट अँड वॉच करावे लागत आहे.

आगामी होणाऱ्या भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक निवडून येणार आहेत व सर्वप्रथम १ नगराध्यक्ष निवडून येणार आहे. उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींना उमेदवारी देताना मात्र मोठी कसरत व शिताफीने तिकीट द्यावे लागणार आहे. जरी जास्त इच्छुक उमेदवार असले तरी पक्षाकडून मात्र एकाच उमेदवाराला तिकीट दिले जाणार असल्याने तो कोण उमेदवार असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संग्राम थोपटे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे पूर्वीचे काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सध्या भाजपचे पारडे जड झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अनेकांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीची शहरात मोठी ताकद वाढली आहे. दोन्ही पक्ष मात्र कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असणार आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवून असून त्याप्रमाणेच तिकीट वाटप करणार असल्याचे दिसत आहे.

भाजपकडून दोन नावे..
नगराध्यक्ष पदासाठी भाजप पक्षाकडून संजय जगताप व गणेश पवार या दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असून राष्ट्रवादीमध्ये नुकतेच प्रवेश करून आलेले रामचंद्र आवारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यशवंत डाळ, जिद्द फाउंडेशनच्या कविता खोपडे हे उमेदवार इच्छुक आहेत. भोर शहरात सोशल मीडियावर मात्र सर्वच इच्छुक उमेदवार आपआपल्या शैलीत मोठा प्रचार करताना दिसत आहेत.

बावीस मतदान केंद्रे
भोर नगरपरिषद निवडणुकीसाठी आठ इमारती निश्चित करून २२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी कार्यरत केले असून आठ तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. भोरला १० प्रभागांमधून २० नगरसेवकांसाठी तर एक नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणूक कार्यक्रमात १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १८ नोव्हेंबरला छाननी होणार असून १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशन पत्र निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपिल प्रक्रिया २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.नगरपरिषदेच्या निवडणूक उमेदवारीसाठी सोमवारपासून सुरुवात झाली असून चार दिवसात फक्त २ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. शहरात ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व्हर डाऊन असल्याने एका एका उमेदवाराला दोन तास अर्ज भरण्यास विलंब होत आहे.

The post Bhor Election : नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच! भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस, पण उमेदवार यादी मात्र गुलदस्त्यात appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!