मोठी बातमी.. ! निवडणुकीच्या तोंडावर मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Amit Thackeray
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी जमावबंदी उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कलमांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याच्या अनधिकृत अनावरणाशी निगडित आहे. चार महिन्यांपासून रखडलेल्या या अनावरणाने अमित ठाकरेंनी सरकारी निष्काळजीपणावर तीव्र टीका केली होती. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे शनिवारी (१६ नोव्हेंबर) नवी मुंबईत पक्षाच्या विविध शाखा उद्घाटन कार्यक्रमांसाठी आले होते. त्यावेळी नेरूळमधील या पुतळ्याबाबत माहिती मिळाली. हा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या आणि फाटलेल्या कापडाने झाकून ठेवण्यात आला होता, तर अनावरणासाठी कोणताही नेता उपलब्ध नव्हता.

विमानतळ उद्घाटन, दहीहंडी, दिवाळी आणि दसरा सारख्या कार्यक्रमांसाठी नेते हजेरी लावत असताना, स्वराज्य संस्थापक आणि आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक तासही वेळ देता येत नसल्याची खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केली. “निवडणुकीच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे आणि भाषणांतून टाळ्या घेणारे नेते पुतळ्याचे अनावरण करायला तयार नाहीत का? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

या टीकेच्या पार्श्वभूमीवर, अमित ठाकरेंनी रीतसर परवानगी न घेता आणि जमावबंदी असताना मनसैनिकांसह पुतळ्याचे अनावरण केले. यामुळे नेरूळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमित ठाकरे आणि ७० मनसैनिकांवर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १८९ (जमावबंदी उल्लंघन) आणि ३२४ (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हा प्रकार अमित ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा असून, त्यांनी याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. “या कार्यासाठी झालेला हा माझ्यावरील पहिला गुन्हा असेल आणि त्याचा मला आनंदच असेल,” असे त्यांनी म्हटले होते. अमित ठाकरेंनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या भूमीत असा अपमान होणे हे दुर्दैवी आहे आणि मनसे असा अन्याय कधीच सहन करणार नाही. या घटनेने नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारी निष्काळजीवरून जोरदार निदर्शन सुरू आहेत.

The post मोठी बातमी.. ! निवडणुकीच्या तोंडावर मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!