
phaltan: नगरपरिषद निवडणुकीच्या ऐन धामधूमीत महायु्तीकडून आजवर राजकारणातील चाणक्य म्हणविल्या जाणार्या आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तारूढ पार्टीच्या गडाचे एक एक बुरुंज ढासळविण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे यशस्वी ठरताना दिसत आहेत. गटातील महत्वाचे शिलेदार गट सोडून जात असताना त्याबद्दल तसेच नगरपालिकेची निवडणूक कोणत्या पक्षातून, कुठल्या चिन्हावर लढवायची की आघाडी करायची यावर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याचा कमालीचा संयम राजेगटाच्या नेतृत्वाने दाखविला आहे. मात्र, फलटण शहरातील राजकीय उलथापालथीमुळे सध्या जनतेमध्ये देखील लोकप्रतिनिधींच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमावस्था आहे. दुसरीकडे इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या असून नगराध्यक्षपदी लढतीत कोणाचे नाव पुढे येणार याची उत्सुकताही वाढली आहे.
महायुतीच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने जरी दिलिपसिंह भोसले यांचे नाव पुढे येत असले तरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपली प्रबळ दावेदारी दाखविली आहे. त्याचबरोबर त्यांनी फलटण शहरात विविध घटकांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीच्यावतीने नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबाबत शहरात जोरदार चर्चा झडू लागली आहे.
दुसरीकडे सत्तारूढ राजे गटामध्ये अद्याप कमालीची शांतता आहे. गटातील एक एक खंदे समर्थक गट सोडून जात आहेत. सत्ताधार्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजे गटाला भगदाड पाडण्यात माजी खासदार रणजितसिंह, आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. सत्ताधारी राजे गटातील आणखीन ‘बडे मासे’ त्यांच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा असून ते कोण असावेत याबाबत उलटसूलट चर्चा होताना दिसून येत आहे. सत्तारूढ गटातील मोक्याचे चेहरे फोडण्यात जरी त्यांना यश प्राप्त झाले असले तरी या इनकमिंगमुळे व बेरजेच्या राजकारणाच्या नादात गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन त्यांची घालमेल रोखणे, समजूत काढण्याचे जिकरीचे कामही त्यांना करावे लागणार आहे.
एकूणच नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या चार दिवसांवर आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी राजे गट व महायुतीचा उमेदवार अजून स्पष्ट झाला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा उमेदवार होईल, नगरसेवक पदाची कोणाला संधी मिळेल, कोणती आघाडी करून निवडणूक लढवली जाईल, कोणते चिन्ह वापरले जाईल किंवा प्रमुख नेत्यांचे नेमके काय निर्णय होतील याबाबत जनतेमध्ये बुचकळा निर्माण झाला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे फलटण नगरपरिषदेची निवडणूक कोणाला कठीण व कोणाला समाधानकारक ठरणार याबाबतच्या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.
माजी खासदारांचे डावपेच सत्तारूढ गटासाठी डोकेदुखी
एका बाजूला महायुतीच्यावतीने माजी खासदारांचे राजकीय डावपेच सत्तारूढ गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यांच्या हालचालींनी राजकीय पटावरील मोहरे बदलत आहेत. सत्ताधार्यांमधील असंतोषाचा फायदा घेत गळ टाकण्याचे धोरण राबविले आहे. त्याला मोठे यशही लाभले आहे. अजूनही सत्ताधारी गटातील काही ‘बडे मासे’ विरोधकांच्या छावणीत दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकूणच सत्ताधारी गटातील अंतर्गत वाद, नेतृत्वातील अस्पष्टता आणि मी प्रथम वृत्ती व निष्ठावंतांकडे दुर्लक्ष या परिस्थितीचा लाभ घ्यायला विरोधकांना भरपूर वाव मिळाला असे बोलले जात आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना सत्तारूढ गटामध्ये अद्याप उमेदवार ठरविण्याबाबत एकमत झाल्याचे दिसत नाही.
तारेवरची कसरत ही करावी लागणार
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार, आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचे, कोणते पक्षचिन्ह घ्यायचे या प्रश्नांची उत्तरे अद्याप धूसरच आहेत. प्रमुख नेत्यांनी दाखविलेला कमालीचा संयम आणि मौन यामुळे कार्यकर्ते तसेच नागरिक दोघेही संभ्रमात आहेत. त्याचबरोबर गटातील जे जे खंदे समर्थक गट सोडून गेले आहेत, त्यांना शह कशा पद्धतीने द्यायचा, त्यांना पर्यायी व तितक्याच ताकतीचे उमेदवार निवडण्याचे काम करण्याबरोबरच गटाला मानणारे कार्यकर्ते जागचे हलू न देण्याची तारेवरची कसरत ही करावी लागणार आहे. एवढ्या घडामोडी घडत असतानादेखील आ. रामराजे यांनी याबाबत अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या घडामोडी घडत असताना ते मुंबईमध्ये आहेत. रामराजे यांची राजकारणातील ही शांतता म्हणजे वादळाची चाहूल तर नाहीना असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
The post phaltan: फलटणमध्ये लोकप्रतिनिधींच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमावस्था दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात मात्र इच्छुकांच्या गाठीभेटी सुरु appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











