Newasa News : सोशल मीडियात पाहुणे कलाकार झाले इच्छुक उमेदवारांचे मुलाखतकार!

Newasa News
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नेवासे: नेवासे नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने शहरात जोर धरला असताना, इच्छुक उमेदवार कमी वेळेत जनतेत लोकप्रिय होण्यासाठी विविध युक्त्या आणि उपक्रम राबवत आहेत. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत सोशल मीडियातील काही पाहुणे कलाकार आणि स्वयंघोषित पत्रकार फेसबुक, व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून उमेदवारांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. हे ‘चालते-बोलते पत्रकार’ उमेदवारांच्या मनसुब्यांची माहिती काढून ती सोशल मीडियावर झळकावत, स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा डाव आखत आहेत.

या तथाकथित पत्रकारांनी उमेदवारांना ‘पावती’ देण्याचा खेळ सुरू केला असून, त्यासाठी फुकटातील प्रसिद्धीचा लोभ दाखवला जात आहे. इच्छुक उमेदवारांना याची पूर्ण जाण असली तरी, प्रसिद्धीच्या आमिषाला बळी पडून काहीजण या जाळ्यात अडकत आहेत. मात्र, जे उमेदवार या फंदात पडत नाहीत, त्यांच्या विरोधातच हे पाहुणे कलाकार लावालावा आणि अफवा पसरवण्याचा उद्योग सुरू करतात. परिणामी, प्रसिद्धीच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या या मंडळींमुळे उमेदवारांवर ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी नामुष्कीची वेळ आली आहे.

ना पत्रकार… ना चित्रकार!
नेवासेच्या राजकीय आखाड्यात सोशल मीडियावर पत्रकार म्हणून मिरवणारे हे पाहुणे कलाकार खरेतर ना पत्रकार, ना चित्रकार! तरीही ‘प्रेस’चे लेबल गळ्यात अडकवून राणाभिमदेवी थाटात वावरत आहेत. बिनपैशाचा हा तमाशा पाहण्यासाठी शहरवासीयांना चांगलाच टाइमपास मिळत असून, निवडणुकीच्या या नाट्याला सोशल मीडियाची जोड मिळाल्याने राजकीय रंगमंच अधिकच रंगतदार झाला आहे.

The post Newasa News : सोशल मीडियात पाहुणे कलाकार झाले इच्छुक उमेदवारांचे मुलाखतकार! appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!