Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Eknath Shinde
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ठाणे: देशभराच्या नजरा लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोजपा (रामविलास) यांसारख्या एनडीए घटक पक्षांनी एकत्रितपणे २०६ जागांवर आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे, महागठबंधनला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असून, त्यांना केवळ मर्यादित जागांवरच समाधान मानावे लागले. या विजयानंतर एनडीएतर्फे देशभरात जल्लोष सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आणि विशेषतः ‘लाडक्या बहिणींच्या’ योगदानाचा उल्लेख केला.

शिंदे म्हणाले, “बिहारच्या जनतेने विकासाला प्राधान्य दिले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामावर विश्वास ठेवला. आधी ‘समोसे में जब तक रहेगा आलू, तब तक रहेगा लालू’ अशी घोषणा होती, पण आता वेळ बदलली आहे. आता ‘जब तक रहेगा आलू, तब तक रहेगा विकास का राज!’ असा काळ आला आहे. लाडक्या बहिणींनी कमाल केली, विकासाला प्राधान्य दिले आणि म्हणूनच विकासराज कायम राहणार आहे. लालू प्रसाद यादव यांचे जंगलराज जनतेने नाकारले आहे.”

विकासराजाची निवड, जंगलराजाचा अंत
शिंदे यांनी प्रचारादरम्यान पाहिलेल्या अनुभवांचा उल्लेख करत म्हटले, “लालू यांच्या राज्यात परिस्थिती किती भयावह होती, हे मी प्रत्यक्ष पाहिले. संध्याकाळी सहा वाजता बाहेर पडणे धोकादायक होते, व्यापारी लवकर दुकाने बंद करत. दिवसाढवळ्या हत्या, लूटमार, बलात्कार यांसारख्या घटना घडायच्या. हे सर्व बदलले आहे, असा लोकांचा विश्वास आहे. म्हणूनच नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने चालणाऱ्या डबल इंजिन सरकारचे मी कौतुक करतो. जनतेने या सरकारवर विश्वास दाखवला आहे. हा विजय मोदी यांच्या दूरदृष्टीचा, नितीश कुमार यांच्या कामांचा आणि बहिणींच्या विश्वासाचा आहे. बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा जंगलराज नाकारले आणि विकासराजाची निवड केली. काँग्रेसला तर विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याइतकीही जागा मिळाल्या नाहीत.”

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही ठसठशीत बहुमत
शिंदे यांनी पुढे सांगितले, “नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रासह बिहारनेही ठाम विश्वास दाखवला. यात गृहमंत्री अमित शहा यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या चाणक्यनीतीमुळे हे सर्व काम लोकांसाठी साकार होत आहे. बिहारमध्ये अनेक वर्षांपासून चालू असलेल्या विकासकामांना नितीश कुमार यांचा पाठिंबा आणि मोदी यांचे नेतृत्व लाभले आहे. हा विजय बिहारच्या जनतेचा, भगिनींचा, मोदी आणि नितीश कुमार यांचा आहे. हा विश्वासाचा विजय आहे. मतदार यादी पुनर्रचनेबाबत विरोधकांनी आरोप केले, पण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती. काही लोक फक्त टीका करण्यासाठीच असतात. महाराष्ट्रात जसे ठोस बहुमत मिळाले, तसेच बिहारमध्येही मिळाले. आम्ही एनडीएचे घटक आहोत. मी बिहारला गेलो असता, लोकांनी मला प्रेमाने स्वीकारले आणि दिलेली जबाबदारी मी पार पाडली.”

लाडक्या बहिणींनी बिहारलाही तारले
शिंदे यांनी महिला मतदारांवर विशेष भर देत म्हटले, “आमच्या लाडक्या बहिणींनी मनापासून मतदान केले. जसे महाराष्ट्रात दणकट यश मिळाले, तसेच बिहारमध्येही मिळाले. लोकांना जंगलराज नको, विकासराज हवा आहे. लाडक्या बहिणींचे मी विशेष अभिनंदन करतो. त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून लोकशाहीला बळ दिले. महाराष्ट्रात जसा लँडस्लाईड विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता, तसाच बिहारमध्येही या लाडक्या बहिणींमुळे मिळाला. म्हणून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले, विकासराज स्वीकारले आणि म्हणूनच असा भव्य विजय मिळाला. जशी महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबवली, त्याचप्रमाणे या लाडक्या बहिणींनी बिहारलाही तारले आणि लँडस्लाईड विजय मिळवून दिला.”

शिंदे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही विश्वास व्यक्त करत म्हटले, “महायुती आपल्या कामाच्या आणि विकासाच्या जोरावर सर्वत्र दणकट विजय मिळवेल.” बिहारच्या निकालाने एनडीएला नवीन ऊर्जा मिळाली असून, देशातील राजकीय समीकरणे अधिक मजबूत झाल्याचे दिसत आहे.

The post Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!