
प्रभात वृत्तसेवा
पुणे – औंध जिल्हा रुग्णालयातील (एडीएच) एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या फार्मसीमधून मेफेंटरमाइन सल्फेटच्या २० व्हायल्स (बाटल्या) चोरल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने एडीएचमार्फत सरकारी रुग्णालयांना पुरवल्या जाणाऱ्या औषध आणि उपकरणांच्या साठ्याची चौकशी आणि जिल्हाव्यापी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
१० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७९ च्या नियम २ आणि ४ अंतर्गत वर्ग ४ कर्मचारी स्वप्नील चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. निःपक्षपाती चौकशी सुनिश्चित करण्यासाठी निलंबन कालावधीत त्यांना ग्रामीण रुग्णालय, आळंदी येथे त्यांचे मुख्यालय म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कर्मचाऱ्याने या व्हायल्स चोरल्याचे कबूल केले आहे.
प्रथमदर्शनी २० व्हायल्स गायब आहेत; परंतु आम्ही अजूनही ही औषधे विकली, की इतरत्र वापरली, याचा तपास करत आहोत, अशी माहिती पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन आणि एडीएचचे प्रमुख डॉ. नागनाथ येम्पले यांनी दिली.गेल्या आठवड्यात एडीएचमधील कालबाह्य औषधांच्या साठ्याची माहिती घेताना फार्मसीच्या नोंदींमध्ये तफावत आढल्यावर ही चोरी उघडकीस आली. अंतर्गत चौकशीत चव्हाणने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की मेफेंटरमाइन सल्फेट हे एक ‘शेड्यूल एच’ कॅटेगरीतील औषध असून, हृदयरोग उत्तेजक आहे. अनेकदा कार्यक्षमता वाढविण्यसाठी त्याचा गैरवापर होतो. ते प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येत नाही आणि काळ्या बाजारात त्याला मागणी आहे. याआधी पुणे पोलिसांनी औषधाच्या बेकायदेशीर विक्री आणि वापरासाठी जिम प्रशिक्षक, तरुण व्यावसायिक आणि लहान विक्रेत्यांना अटक केली आहे.
जिल्हाव्यापी ऑडिटचे आदेश
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना सर्व औषध आणि उपकरणांच्या साठ्याची तात्काळ प्रत्यक्ष पडताळणी करून १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी ऑडिट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, ऑडिटनुसार गैरव्यवहार किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. येम्पले यांनी सांगितले.
The post Pune Crime : औंध जिल्हा रुग्णालयात औषध चोरी! मेफेंटरमाइनच्या व्हाइल्स चोरल्याप्रकरणी कर्मचारी निलंबित appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











