“नाहीतर शेतातच पेटवून घेईन”; खालापूरमध्ये कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकरी हवालदिल..वाचा सविस्तर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – तालुक्यातील खासगी कंपनीकडून प्रदूषित सांडपाणी शेतामध्ये सोडल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कारवाई झाली नाही तर शेतातच आत्मदहन करण्याचा इशारा बाधित शेतकरी सूर्यकांत गायकवाड यांनी दिला आहे.कंपनीच्या मागील बाजूस गायकवाड यांची शेती असून, अनेक वर्षांपासून कंपनीकडून केमिकलयुक्त सांडपाणी या शेतीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पाण्यामुळे मातीची सुपीकता नष्ट झाली असून, शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. यामुळे गायकवाड यांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भीम शक्ती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि. ६) तहसील कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कृषी विभागाला तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले.

यानुसार, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवडे यांनी बुधवारी (दि. १२) गायकवाड यांच्या शेताची पाहणी करून काळ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. कंपनी परिसराची व शेतातील पाण्याची नमुना तपासणी करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी.

गेल्या २५ वर्षांपासून मंगलम ऑरगॅनिक्स कंपनी माझ्या शेतात सांडपाणी सोडत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे माझे पीक नष्ट झाले असून, जमीन पूर्ण नापीक झाली आहे. प्रदूषण मंडळाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. कंपनी व्यवस्थापन जबाबदारी टाळण्यासाठी पाणी गावच्या नाल्यातून येते, असा खोटा दावा करत आहे.
– सूर्यकांत गायकवाड, बाधित शेतकरी

The post “नाहीतर शेतातच पेटवून घेईन”; खालापूरमध्ये कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतकरी हवालदिल..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!