Mumbai Bribe News: न्याय देणारे न्यायाधीशच अडकले ACBच्या जाळ्यात; 15 लाख लाच.., लिपिकासह अतिरिक्त सत्र न्यायाधीशांविरुद्ध गुन्हा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबईतील माझगांव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील एका लिपीकाला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून, अटकेनंतर लिपिकाने थेट अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल करून लाच स्वीकारल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, न्यायाधीशांनीही रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने, एसीबीने लिपिकासह न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. थेट न्याय देणारे न्यायाधीशच या जाळ्यात अडकल्याने न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

२५ लाखांची मागणी, १५ लाखांवर तडजोड –
या प्रकरणी लिपीक चंद्रकांत हनमंत वासुदेव (४०) याला अटक करण्यात आली असून, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या जागेच्या वादासंबंधीची केस दिवाणी सत्र न्यायालय, माझगांव येथे वर्ग करण्यात आली होती.

याच कामासाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी लिपीक वासुदेव याने तक्रारदाराशी संपर्क साधला. वासुदेव याने न्यायाधीशांच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी थेट २५ लाख रुपयांची मागणी केली होती. यात १० लाख रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित १५ लाख रुपये न्यायाधीशांसाठी देणे अपेक्षित असल्याचे त्याने सांगितले होते. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने, तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत १० नोव्हेंबर २०२५ रोजी एसीबीकडे धाव घेतली.

न्यायाधीशांची संमती, दोघांविरुद्ध गुन्हा –

तक्रारीनंतर एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये वासुदेव यांनी १५ लाख रुपयांची लाच घेण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान वासुदेवने तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

अटक झाल्यानंतर वासुदेवने दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी (५५) यांना कॉल करून लाचेची रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली. न्यायाधीश काझी यांनीही त्यास संमती दर्शवल्याने, एसीबीने वासुदेवसह न्यायाधीश काझी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

न्यायाधीशांच्या अटकेसाठी परवानगीची मागणी –
या गुन्ह्यात वासुदेवला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. एसीबीने सांगितले की, न्यायाधीशांच्या अटकेसाठी तसेच त्यांच्या घरझडतीसाठी आवश्यक परवानगी मागण्यात आली आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

The post Mumbai Bribe News: न्याय देणारे न्यायाधीशच अडकले ACBच्या जाळ्यात; 15 लाख लाच.., लिपिकासह अतिरिक्त सत्र न्यायाधीशांविरुद्ध गुन्हा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!