
पिंपरी – महापालिकेच्या सन २०१७ च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीच्या जागेवरून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांपैकी अनेक जणांना आरक्षणाचा फटका बसला आहे. ज्यामध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. परिणामी या नेत्यांना निवडणूक लढविण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
त्यामध्ये प्रभाग ४ मध्ये विकास डोळस, प्रभाग १९ शैलेश मोरे, प्रभाग २९ मधून सागर आंगोळकर, प्रभाग ३१ मधून अंबरनाथ कांबळे, ३२ मधून संतोष कांबळे यांचा समावेश आहे. त्यांना आरक्षित जागेवरून पुन्हा लढता येणार नाही. तर, एससी महिला आरक्षित जागांमुळे प्रभाग १० मधून अनुराधा गोरखे, प्रभाग २१ निकिता कदम, प्रभाग क्रमांक २३ मनिषा पवार या माजी नगरसेविकांच्या जागा सुरक्षित झाल्या आहेत.
अनुसूचित जमातीच्या तीनपैकी प्रभाग २९ व ३० मधील दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. माजी नगरसेविका उषा मुंढे यांची जागा यामध्ये सुरक्षित झाली आहे. अंतिम प्रभागरचनेत झालेल्या बदलामुळे एससी व एसटी आरक्षणात बदल झाला. परिणामी, प्रभाग ३ मोशी, चऱ्होली आणि प्रभाग १७ बिजलीनगर, भोईरनगरमध्ये अनूसूचित जातीचे आरक्षण पडले.
या दोन्ही प्रभागात सर्वसाधारण जागेवरून लढणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. आरक्षित जागांमुळे दोन्ही ठिकाणी माजी नगरसेवकांमध्ये चुरस पहायला मिळणार आहे. महिला नगरसेविकांमध्ये प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा धर यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले.
रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे या अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या जागेवर महिला आरक्षण पडलेले नाही. या जागेवर पुरुष व महिला दोन्ही उमेदवार रिंगणात असतील. यापैकी सावळे या पिंपरी विधानसभेमधून इच्छुक होत्या. तर कांबळे आणि शिलवंत-धर यांनी विधानसभा लढवलेली आहे.
प्रभाग १० मध्ये एससी व ओबीसीच्या जागांवर महिला आरक्षण पडले आहे. तिथे राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांनाही सर्वसाधारण जागेवरून लढावे लागणार आहे. प्रभाग १२ मध्ये एक जागा ओबीसी, तर दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहे. तिथे सर्वसाधारण जागेवरून राष्ट्रवादीचे पंकज भालेकर व प्रवीण भालेकर दोन नगरसेवक होते.
त्यांच्यासह प्रभागातील सर्वपक्षीय इच्छुकांची कोंडी होणार आहे. प्रभाग ३० मध्ये सर्व जागा आरक्षित झाल्यामुळे या प्रभागात खुल्या गटातील इच्छुकांची कोंडी होणार आहे. तर, ओबीसी जागा महिलांसाठी राखीव नाही. त्यामुळे माजी नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.
उपाध्यक्षांच्या मुलाला शोधावा लागणार दुसरा प्रभाग
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे हे महापालिका निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करत होते. प्रभाग क्रमांक १९ मधून ते इच्छुक होते. मात्र, त्याठिकाणी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे बनसोडे यांना नवीन प्रभागातून तयारी करावी लागणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास कलाटेंची अडचण
प्रभाग क्रमांक २५ मध्ये अनुसूचित जाती, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला अशा तीन जागा राखीव आहेत. तर फक्त एकच जागा अराखीव आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे व अजित पवार गटाचे मयूर कलाटे आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर या दोंघाच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे.
The post Pimpri : आरक्षण सोडतीत प्रस्थापित नेत्यांना धक्का; विधानसभा लढवलेल्या उमेदवारांची वाट बिकट appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











