
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ११) पार पडली. त्यानंतर शहरातील ३२ प्रभागांमधील चित्र स्पष्ट झाले आहे. सोडतीनंतर कुठे व कसे लढायचे यासाठी वाट पाहत असलेले इच्छुक, माजी नगरसेवक आता लढाईसाठी सज्ज झाले आहेत.
प्रभागातील मतांचे गणित मांडले जात असून तिकीटासाठी पक्षश्रेष्ठींकडे वाऱ्या सुरू झाल्या आहेत. आगामी काळात निवडणुकीला आणखी रंग चढणार असून पिंपरी चिंचवड महापालिकेवर कोणाची सत्ता येते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय ३२ प्रभागांची अंतिम रचना झाली आहे. त्यानंतर मंगळवारी आरक्षण सोडत पार पडल्याने कोणत्या ठिकाणी कोणी लढायचे याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षण कोणत्या प्रभागामध्ये आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे.
तर ज्यांना लढण्यासाठी सोयीस्कर प्रभाग मिळाला आहे त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी दुपारीच अनेक जणांनी आमदार, खासदारांशी फोनवर संवाद साधला. सोडतीमध्ये जागा सुटली असून तिकीटासाठी गाऱ्हाणे घातले. तर अनेक नाराज इच्छुकांनी काय करता येईल, दुसऱ्या प्रभागातून लढता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे.
दरम्यान, शहरामध्ये महायुतीमध्ये फूट पडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष वेगळे लढण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये एकत्र लढल्यास मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी दोन्ही पक्षांना परवडणारी नाही. त्यामुळे भाजपा हायब्रिड युतीमध्ये लढण्यास इच्छुक असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. याच गोष्टीचा अंदाज घेत इच्छुक व माजी नगरसेवकांनी दोन्ही पक्षातील वरिष्ठांकडे गळ घालण्यास सुरूवात केली आहे. प्रभागातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी सामाजिक माध्यमावर चमकोगिरी देखील सुरू केली आहे. एकूणच प्रभागांतील चित्र स्पष्ट झाल्याने इच्छुक व माजी नगरसेवकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
अन्यथा अपक्ष लढणार
अनेक नवख्या उमेदवारांनी सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी सुरू केली आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून ते प्रभागामध्ये तयारी करत आहेत. त्यामध्ये आरक्षण सोडतीत काहींची संधी हुकली आहे. तर काहींनी ज्या प्रभागात तयारी केली त्या प्रभागातील चित्र त्यांच्यासाठी अनुकूल असल्याने त्यांचा हुरुप वाढला आहे. त्यांनी शहरातील नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे. नेत्यांनी प्रतिसाद दिला तर ठीक. अन्यथा अपक्ष निवडणूक लढण्यासाठी या नवख्यांची तयारी जोरात सुरू झाली आहे.
The post Pimpri : नेत्यांच्या दरबारी इच्छुकांची वारी; राजकीय गणिते मांडण्यास सुरूवात appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











