PMC Election : कोणाचा पत्ता कट, कोणाला लागणार लाॅटरी? महापालिकेची आज आरक्षण सोडत, दिग्गजांचे भवितव्य पणाला

PMC Election
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (मंगळवारी) प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीनंतर शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या प्रभागातून कोण उभे राहणार, कोणाची जागा राखीव होणार आणि कोणाचे राजकीय गणित बिघडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रामुख्याने समाविष्ट गावांसह नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात मोडतोड करत हद्दी बदलण्यात आल्या असल्याने काही प्रभागांमध्ये आरक्षणे बदलण्याची शक्यता आहे.

महिला आरक्षणामुळे आणि प्रभागांच्या बदलेल्या हद्दीमुळे अनेक प्रभागांत माजी नगरसेवकांना एकमेकांच्या समोर लढावे लागणार आहे. सकाळी ११ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आरक्षण अनुकूल पडावे, यासाठी देव पाण्यात ठेवले असून, अनेकांककडून देवदर्शनासाठी रविवारीच पुणे सोडले आहे.

महापालिकेच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुका चार सदस्यांच्या प्रभागानुसार होणार असून, १६५ नगरसेवक असणार आहेत. त्यासाठी ४१ प्रभाग असून, त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर आंबेगाव-कात्रज हा पाच सदस्यीय प्रभाग आहे. एकूण जागांपैकी ५० टक्के म्हणजे ८३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी २२, अनुसूचित जमातींसाठी २ आणि ओबीसींसाठी ४४ जागा राखीव असणार आहेत.

असे काढले जाणार आरक्षण..
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आधी एसटी, नंतर एससी आणि त्यानंतर ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण काढले जाईल. एक आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये चक्राकार पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षासाठी उमेदवारी ठरविताना समीकरणे बदलणार आहेत. अनेक ठिकाणी पती- पत्नी, आई- मुलगा किंवा बंधू- भगिनी यांच्यातही तिकीट मिळविण्यासाठी स्पर्धा दिसू शकते. शालेय मुलांच्या हस्ते या आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. त्यासाठीची रंगीत तालीमही सोमवारी प्रत्यक्ष गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या ठिकाणी घेण्यात आली. मंगळवारी काढण्यात आलेल्या प्रारूप आरक्षणाची यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हरकतींसाठी २४ नोव्हेंबर मुदत..
१७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागरिक आणि पक्षांकडून हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकतींची अंतिम मुदत असेल. या हरकती महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये किंवा निवडणूक विभागात प्रत्यक्ष सादर कराव्या लागतील. ऑनलाइन हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

The post PMC Election : कोणाचा पत्ता कट, कोणाला लागणार लाॅटरी? महापालिकेची आज आरक्षण सोडत, दिग्गजांचे भवितव्य पणाला appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!