
प्रभात वृत्तसेवा
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच बारामती नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि स्थानिक आघाडी यांच्यात रंगत असणार आहे. शरद पवार यांच्या गटात अद्याप शांतता दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार गट कोणती भूमिका घेणार की तलवार म्यान करणार, याकडे लक्ष वेधले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नेतृत्वात गेली २५ वर्षे बारामती नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे.
तत्पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार हे पालिकेच्या राजकारणात लक्ष घालत होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जबाबदारी सोपविली. तेव्हापासून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पालिकेचा कारभार सुरू आहे. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंध होती. त्यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध अन्य पक्ष अशी लढत झाली होती. भाजप-शिवसेनेने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. काही अपक्ष उमेदवार निवडणुकीला उभे होते. त्यात ३९ जागांपैकी ३५ जागा राष्ट्रवादीने जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले होते.
यंदा पालिकेच्या दोन जागा वाढल्या आहेत. बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांचेच एकहाती वर्चस्व आहे. राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. नगराध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनी जय पवार हे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने प्रबळ आणि प्रस्थापित इच्छुक नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इच्छुकांचा जीव भांड्यात पडल्याने पुन्हा मोर्चेबांधणी, रणनिती गतिमान केली आहे.
बारामतीत इतर पक्षांची काही प्रमाणात ताकद आहे. ते बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मित्रपक्षांना बरोबर घेवून स्थानिक आघाडी करत निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे काही प्रभागात चुरशीच्या निवडणुका होतील, अशी स्थिती आहे. नगरपरिषदेसाठी २० प्रभाग आहेत. एक ते १९ प्रभागांत प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार आहेत. क्रमांक २० च्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील. नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने एक ते १९ प्रभागांतील मतदारांना तीन तर प्रभाग २० मध्ये मतदारांना चार मते द्यावी लागणार आहे.
बहुजन आघाडी रिंगणात उतरणार?
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत ओबीसी बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. नगराध्यक्ष तसेच २० प्रभागांत ४१ उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे ओबीसी बहुजन आघाडीचे प्रमुख रवींद्र टकले यांनी स्पष्ट केले. बारामतीच्या आखाड्यात बहुजन समाजाचा फॅक्टर कामी येणार काय, याची चर्चा सुरू झाली आहे. बहुजन समाज पार्टी, ओबीसी समाज आघाडीकडून निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे. त्याचा परिणाम बारामती शहरातील ओबीसी घटकांवर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पार्थ प्रकरण, इच्छुकांना संधी
पुण्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा भूखंड घोटाळा उघडकीस आल्याने बारामतीत नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या जय पवार यांचे नाव मागे पडले आहे. पार्थ पवार यांच्यामुळे अजित पवार हे बॅकफूटवर आले आहेत. त्यात बारामती नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचे नाव आघाडीवर होते. जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने इच्छुकांची गोची झाली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय पवार हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाहीत, असे जाहीर केले. त्यामुळे बारामतीमधील इच्छुकांनी रणनितीला गती दिली आहे.
The post Baramati Election : शरद पवार गटाची भूमिका काय? बारामती निवडणुकीत ‘तलवार म्यान करणार’ की लढत घेणार? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











